योकोहोमा - जपानमध्ये संशयित कोरानाबाधित रुग्णांना ठेवण्यात आलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरला आहे. आतापर्यंत ३५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जपानच्या आरोग्य मंत्र्यांनी रविवारी ही माहिती दिली.
या जहाजावर कोरोनाच्या साथीमुळे अमेरिका, कॅनडा आणि हाँग काँगमधून मायदेशी परतलेले नागरिक आहेत. त्यांना विषाणू संक्रमण पसरू नये, यासाठी या जहाजावरच ठेवण्यात आले आहे. शनिवारी या रुग्णांची संख्या ७० वर पोहोचली असल्याचे जपान सरकारने जाहीर केले होते. देशातील सामान्य लोकांमध्ये संक्रमणाची वाढ हा विषाणूचा प्रसार पुढील टप्प्यात पोहोचला असल्याचा पुरावा आहे. यामुळे सरकार चिंतित आहे.
'आतापर्यंत आम्ही १ हजार २१९ जणांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी ३५५ लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे,' असे राष्ट्रीय आहार मंत्री कात्सुनोबू कातो यांनी म्हटले आहे.
५ फेब्रुवारीला इतर देशांमधून जपानमध्ये परतलेल्या नागरिकांना घेऊन हे जहाज टोकियोजवळ योकोहोमा येथील समुद्रात उभे आहे. यावरती ३ हजार ७०० प्रवाशी आणि कर्मचारी आहेत. या सर्वांना ५० देश आणि प्रदेशांमधून आणण्यात आले आहे.