बीजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहानुभूती व्यक्त करणारा संदेश पाठविला आहे. ही माहिती चीनचे भारतामधील राजदूत सन वायडोंग यांनी आज दिली आहे.
भारतामधील कोरोना महामारीच्या स्थितीबाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी भारत सरकार आणि भारतीय जनतेबद्दल सहानुभुती व्यक्त केल्याचे चीनचे भारतामधील राजदूत सन वायडोंग यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
हेही वाचा-कोरोनावरून समाज माध्यमातून तक्रार करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करू नका- राज्यांना 'सर्वोच्च' आदेश
चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी काय म्हटले आहे संदेशात ?
शी जिनपिंग यांनी म्हटले, की सध्याची भारतामधील कोरोना महामारीची स्थिती पाहून मला खूप चिंता वाटत आहे. मी चीनचे सरकार, लोक तसेच माझ्याकडून भारत सरकार आणि लोकांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. मानवता हा सामाईक भविष्याचा समुदाय आहे. देशांची एकता आणि सहकार्यानेच जग हा नक्कीच कोरोना महामारीवर मात करेल.
हेही वाचा-केंद्र सरकार 4,50,000 रेमडेसिवीर इंजेक्शनची करणार आयात
सरकारच्या नेतृत्वाखालील भारतीय लोक नक्कीच महामारीवर मात करू शकतील-
महामारीशी लढण्याकरिता चीनच्या बाजूने सहकार्य बळकट करण्याची तयारी आहे. तसेच त्यासंदर्भात मदत करण्याची तयारी आहे. या सरकारच्या नेतृत्वाखालील भारतीय लोक नक्कीच महामारीवर मात करू शकतील, असा विश्वासही चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
चीनने एप्रिलमध्ये भारताला 5,000 व्हेटिंलेटर, 21,569 ऑक्सिजन व्हेटिंलेटर, 21.48 दशलक्षांहून अधिक मास्क आणि सुमारे 3,800 टन औषधे दिल्याचे चीनच्या राजदुताने म्हटले होते.