काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा मोली यांच्या राजीनाम्याची मागणी सत्तेतील नेत्यांसह विरोधकांकडून होत आहे. राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच पंतप्रधान शर्मा मोली हे आज नेपाळवासियांना संबोधित करणार असल्याची शक्यता आहे.
नेपाळच्या नागरिकांना ओली हे आज संबोधित करतील, अशी शक्यता आहे. वेळ निश्चित झालेली नाही. मात्र तयारी झालेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वेळ निश्चित करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मंत्रालयाच्या सचिवालयातील सूत्राने सांगितले.
सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्टमध्ये सहभागी असलेल्या माजी पंतप्रधान पुष्पकमल दाहाल यांच्या गटाने यापूर्वीच मोली यांच्याविरोधात आवाज उठविला होता. दाहाल यांच्या गटाची बुधवारी बैठक झाली. ओली यांच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी ही बैठक झाल्याचे स्थानिक माध्यमाने म्हटले आहे.
पंतप्रधानांविरोधात स्थायी समितीमधील सदस्य
पहिल्यांदाच स्थायी समितीच्या 44 सदस्यांपैकी 31 सदस्य हे ओली यांच्याविरोधात गेले आहेत. विविध विषयात पंतप्रधानांना अपयश आल्याने राजीनामा द्यावा, अशी वरिष्ठ नेत्यांनी मागणी केली आहे. पंतप्रधानांचा राजीनामा मागणाऱ्या नेत्यांमध्ये पुष्पकमल दाहाल, झलानाथ खनाल आणि बामदेव गौतम य नेत्यांचा समावेश आहे.
भारतावर आरोप केल्याने पंतप्रधानांबाबत नाराजी-
पंतप्रधान ओली यांनी भारताला माझा राजीनामा हवा आहे, असे विधान केले होते. या वादग्रस्त विधानावरून स्थायी समितीच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचे एका माध्यमाच्या वृत्तात म्हटले आहे. पंतप्रधान ओली हे स्वत:च्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षात गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांनी केला आहे. ओली हे चांगले धोरण आणि योजनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले आहेत. गेली तीन वर्षे ते भांडवलदारांसाठी धोरण राबवित आहेत. तर पक्षाची बांधिलकी असलेल्या समाजवादाच्या ध्येयाकडे दुर्लक्ष करत असल्याचाही त्यांनी आरोप केला.