बीजिंग - जगभरात कोरोनाचा प्रसार होवून आता एक वर्ष होत आले आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूचा फैलाव नक्की कोठून झाला? कोणत्या प्राण्यापासून झाला? याचा वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे शोध लागला नाही. चीनमधील वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोना जगभरात पसरला असेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, त्यास योग्य असे पुरावे अद्यापही मिळाले नाहीत. याच सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहान शहरात दाखल झाले आहे.
सिंगापूरवरून डब्ल्यूएचओचे पथक वुहानला रवाना -
सिंगापूर शहरातून डब्ल्युएचओचे पथक वुहानमध्ये येत असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्ते लाओ लिझिन यांनी दिली. सर्वात पहिल्यांदा डिसेंबर २०१९ मध्ये वुहान शहरातील मांस बाजारात कोरोनाचा विषाणू आढळून आला होता. वटवाघूळ किंवा खवले मांजरापासून कोरोनाचा विषाणू मांस बाजारात आल्याचे मानले जाते. मात्र, याबाबत अधिकृत पुरावा आत्तापर्यंत मिळाला नाही. कोरोनामुळे जगभरात आत्तापर्यंत लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कोठून झाला, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अनेक देशांनी केली होती.
फैलावाच्या तपासास चीनने नाकारली होती परवानगी -
कोरोना विषाणूचा प्रसार चीनमधून झाला हे मानण्यास चीन तयार नव्हता. त्यामुळे चीनने तपासाची परवानगीही दिली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडासह अनेक देशांशी चीनचे संबंध बिघडले. मात्र, आता चीनने तपास पथकाला परवानगी दिली आहे. जगभरात आत्तापर्यंत सुमारे ९२ कोटी ३१ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सुमारे १९ लाख ७७ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.