इस्लामाबाद - इस्रायलला मान्यता देण्यासाठी काही देश पाकिस्तानवर दबाव टाकत असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. मात्र, 'झायोनिस्ट' देशाशी पाकिस्तान कधीही संबंध प्रस्थापित करणार नसल्याचे ते म्हणाले. एका वृत्तवाहीनीला मुलाखत देताना त्यांनी पाकिस्तान-इस्रायल संबंधांवर मत व्यक्त केले.
मोहम्मद अली जीनांच्या मार्गावर चालणार
संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन या दोन अरब देशांनी इस्रायलला नुकतेच मान्यता दिली आहे. त्यामुळे पाकिस्ताननेही इस्रायलला मान्यता द्यावी, अशी विचारणा काही देशांकडून होत आहे. ही मागणी पाकिस्तान आत्तापर्यंत नाकारत आला आहे. मात्र, आता दबाव वाढत आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला होता. त्यामुळे इस्रायल आणि पाकिस्तानबाबत निर्णय घेताना जीना यांच्या विचारावर चालण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे खान म्हणाले.
दबाव टाकणाऱ्या देशांची नावे उघडपणे सांगू शकत नाही
पॅलेस्टाईन प्रश्नावर तोडगा निघाल्याशिवाय इस्रायलला आम्ही परवानगी देणार नाही, यात कोणतीही शंका नाही, असे इम्रान खान म्हणाले. कोणत्या देशांनी इस्रायलला मान्यता देण्यास दबाव आणला याबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले. ज्या देशांनी आमच्यावर दबाव आणला त्यांच्याशी आमचे चांगले संबंध असून काही गोष्टी आम्ही उघडपणे सांगू शकत नाही, असे इम्रान खान म्हणाले. अमेरिकेच्या मध्यस्थीने युएईने इस्रायलबरोबर शांतता करार केला आहे. अनेक मुस्लीम देश इस्रायल बरोबरचे संबंध सुधारत असल्याचे दिसून येत आहे.