कराची - पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेट्टा शहरात आज (रविवार) बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ३ जण ठार झाले तर ७ जण जखमी झाले. शहरातील हजरतगंज मार्केटमध्ये ही घटना घडली. विरोधकांनी रॅलीचे आयोजन केले असतानाचा शहर स्फोटाने हादरले.
पोलिसांचा कडेकोट पहारा असताना झाला स्फोट
पाकिस्तानातील ११ विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकार विरोधात आघाडी तयार केली असून आज क्वेट्टा शहरात मोठी रॅली आयोजित केली होती. या सभास्थळापासून सुमारे अर्धा तासाच्या अंतरावर स्फोट झाला. अय्युब गार्डवर ही सभा झाली. यावेळी पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता. तरीही शहरात बॉम्बस्फोटाची घटना घडली.
पोलिसांचा परिसराला वेढा
स्फोटानंतर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून नागरी भाग खाली केला आहे. सुरक्षा दले तपास करत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव बलुचिस्तानात सभा घेण्यास सरकारने विरोधी पक्षांना नकार दिला होता. मात्र, ही विनंती झुगारत विरोधकांनी सभा घेतली. इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी ११ विरोधी पक्षांनी केली आहे. त्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे.