सेऊल - दक्षिण कोरियात कोरोना विषाणूच्या तडाख्यात आणखी 334 जण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांचा आकडा 1,595 वर पोहोचला आहे. शासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपलब्ध औषधांसह जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
चीनमध्ये महिन्याभरात कोरोनाचे 29 बळी
या महिन्याभरात चीनमध्येही कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या 29 वाढली आहे. मात्र, या महिन्यातील संख्या मागील दोन महिन्यांच्या तुलनेत कमी आहे. चीनमध्ये सध्या कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. तरीही कोरोनाचे जगातील सर्वात रुग्ण चीनमध्येच आहेत. चीनमध्ये आत्तापर्यंत 80 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून यातील 2 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मध्यपूर्वेत कोरोनाचा प्रसार
मध्यपूर्वेतील देशांमध्ये याचा प्रसार वेगाने होत आहे. इराणसह इतर आखाती देशांमधील लोकांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये आतापर्यंत 139 कोरोनाचा संसर्ग झाल्याची अधिकृतरीत्या माहिती मिळाली आहे. यापैकी 39 जण बरे झाले आहेत. यातील 30 जणांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. येथे आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
युरोपमध्ये कोरोना
इटली, फ्रान्स, स्पेन या युरोपीय देशांमध्येही कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत इटलीमध्ये कोरोना बाधितांची संख्या ३२२ वर पोहोचली होती. यातील १० जणांचा मृत्यू झाला आहे.
138 भारतीयांना कोरोनाची लागण
आतापर्यंत 138 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यातील सहा जण क्रू मेंबर असून इतर सर्व प्रवाशी आहेत. हे सर्वजण जपानच्या किनाऱ्यालगत समुद्रात उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावर आहेत. पाकिस्तानातही #COVID१९ चे दोन रुग्ण आढळले आहेत.