इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कोरोनाची दुसरी लाट दिसून येत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाने देशाच्या काही भागात लॉकडाऊन लागू केला आहे. देशातील कोरोना रुग्णवाढीचा दर ११ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी पूर्व पंजाब प्रांतातील प्रशासनानेही दोन आठवड्यांचा आंशिक लॉकडाऊन जाहीर केला. ज्या भागांमध्ये जास्त रुग्ण आढळून येत आहेत त्या भागांमध्ये एक एप्रिलपासून हा लॉकडाऊन लागू असणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान सरकारने अद्याप पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेणे टाळले आहे. देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणखी बिघडू नये यादृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. सोमवारी देशात ४,५२५ नव्या कोरोना रुग्णांसह ४१ मृत्यूंची नोंद झाली.
आतापर्यंत देशात एकूण ६ लाख ५९ हजार ११६ रुग्ण आढळून आले आहेत. तर, १४ हजार २५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : 'द एव्हर गिव्हन' : सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजाची अखेर सुटका