काठमांडू- नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे नेते पंतप्रधान केपी शर्मा ओली, पुष्प कमल दहल आणि माधव कुमार यांनी पक्षाच्या केंद्रीय स्थायी समितीची बैठक आज होणार आहे. पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी स्थायी समितीची बैठक पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्रीय स्थायी समितीची बैठक गेल्या महिन्यात सुरू झालेली होती. मात्र, सत्तासंघर्षामुळे ती स्थगित करण्यात आली होती. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची स्थायी समिती ही महत्वाची समिती मानली जाते.
पुष्प कमल दहल प्रचंड यांनी केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ओली यांनी भारताविषयी केलेले वक्तव्य हे राजकीय आणि राजनैतिकदृष्टया चुकीचे होते, असे प्रचंड यांनी म्हटले होते.
ओली यांनी सत्ताधारी पक्षातील काही नेते भारतासोबत मिळून त्यांना सत्तेतून पायऊतार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यावरुन सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद वाढले होते. नेपाळने काही दिवसांपूर्वी भारताचे तीन भूभाग त्यांच्या नकाशामध्ये दाखवले होते.
ओली आणि प्रचंड यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच वेळा चर्चा झाल्या. त्या पार्श्वभूमीवर नेपाळ कम्युनिस्ट पार्टीच्या स्थायी समितीची बैठक होत आहे.