काठमांडू - नेपाळने नवा नकाशा प्रसिद्ध करत भारतातील काही भूभूगांवर दावा केल्याने दोन्ही देशांदरम्यान सध्या तणावाचे वातावरण आहे. नव्या नकाशानुसार, नेपाळने लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारताच्या भूभागावर दावा केला आहे. या नव्या नकाशाच्या प्रती नेपाळ संयुक्त राष्ट्र आणि गुगलला पाठवणार आहे.
आम्ही नव्या नकाशाच्या प्रती यूएन एजन्सीज आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठवणार आहोत. ही प्रकिया ऑगस्ट महिन्यात पूर्ण होईल, असे नेपाळच्या मंत्री पद्म अर्याल यांनी माध्यमांना सांगितले. नव्या नकाशाच्या इंग्रजी भाषेमध्ये 4 हजार प्रत तयार करण्यात येत आहेत. नेपाळ मापन विभागाने नकाशाच्या 25 हजार प्रत छापल्या असून त्या जगभरात वितरीत करण्यात येणार आहेत. प्रांतीय आणि इतर सर्व सार्वजनिक कार्यालयांना प्रती विनामूल्य दिल्या जातील तर नागरिक नेपाळी चलनातील 50 रुपयांत एक प्रत खरेदी करू शकतील.
नेपाळची ही कृती एकतर्फी असून ऐतिहासिक तथ्ये आणि पुराव्यांवर आधारित नसल्याचे भारताने म्हटले आहे. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याच्या विरोधात नेपाळकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अशा प्रकारे कृत्रिमरित्या सीमा वाढविण्याचा नेपाळचा प्रयत्न कधीही स्वीकारणार नाही, असेही भारत सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, भारताच्या हद्दीतील आणि रणनितीच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भाग नेपाळने त्यांच्या प्रशासकिय आणि राजनितिक नकाशात समाविष्ट केले आहेत.