टोकीयो - या वर्षी जुलै महिन्यात जपानमधील क्योटो शहरात एका अॅनिमेशन स्टुडिओला शिंजी ओबा या हल्लेखोराने आग लावली होती. या घटनेत स्टुडीओत काम करणाऱ्या ३६ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी हल्लेखोराने गुन्हा कबूल केला आहे. जास्त लोकांना मारण्यासाठीच हल्ल्यासाठी स्टुडिओ निवडल्याचा धक्कादायक खुलासा त्याने आपल्या जबाबामध्ये दिला आहे.
मला वाटले या कंपनीमध्ये जास्त लोक आहेत, त्यांमुळे जास्त लोक जखमी होतील, असे हल्लेखोराने पोलिसांना सांगितले आहे. शिंजी ओबा(४१) असे हल्लेखोराचे नाव आहे.
क्योटो अॅनिमेशन स्टुडीओची इमारत पेटवून देताना हल्लेखोरही जखमी झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर शनिवारी पोलिसांनी प्रथमच त्याचा जबाब नोंदवला. याप्रकरणी ओबा वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ जुलै रोजी जपानमधील क्योटो शहरातील 'क्योटो अॅनिमेशन स्टुडिओ' या कंपनीला हल्लेखोराने आग लावली होती. ज्वलनशिल पदार्थ टाकून कंपनीला आग लावून देण्यात आली होती. त्यावेळी कंपनीमध्ये ७४ जण काम करत होते. या आगीमध्ये ३६ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर अनेकांनी इमारतीवरून उड्या मारल्याने जखमी झाले होते.