इस्लामाबाद - भारताच्या राजनैतिक दबावासमोर झुकत इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुनावणीसाठी खंडपीठ स्थापन केले आहे. शुक्रवारी मुख्य न्यायाधीश अथार मिल्लाल्ला, न्यायमूर्ती अमीर फारूक आणि न्यायमूर्ती मियां गुल हसन औरंगजेब यांचा समावेश असलेल्या खंडपीठाची स्थापना केली. खटल्याची सुनावणी तीन सप्टेंबरला होईल. जाधव यांना कायदेशीर प्रक्रियेसाठी मदत मिळावी, यासाठी भारताने सातत्याने दबाव आणला होता. त्यानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदतीसाठी वकिलाची सोय भारत सरकारने करावी. यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा दावा इम्रान खान सरकारने केला आहे. याआधी पाकिस्तानातील माध्यमांनी इस्लामाबाद न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना त्यांची भूमिका मांडण्याची संधी द्यावी, असे सांगितल्याचे वृत्त दिले होते. मात्र, पाकिस्तान सरकारकडून आम्हाला अशाप्रकारचे काहीही कळवण्यात आलेले नाही, असे भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
कुलभूषण जाधवप्रकरणी पाकिस्तानने प्रभावी उपाययोजना करण्याचे सर्व मार्ग रोखले असल्याचे भारताने गेल्या महिन्यात म्हटले होते.
जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली 2016 मध्ये बलुचिस्तानमधून अटक केल्याचा दावा पाकिस्तानने आधीपासून केला आहे. तर, पाकिस्ताचे हे सर्व आरोप फेटाळून लावत कुलभूषण जाधव यांना चाबहारच्या इराणी बंदरातून अपहरण करून आणल्याचे भारताने म्हटले आहे.
पाकिस्तानने व्हिएन्ना करार आणि कायदेशीर संबंधांच्या निकषांचे अनेकदा गंभीररीत्या उल्लंघन केले आहे, असा भारताचा दावा गेल्या वर्षी जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने उचलून धरला होता.