वेलिंग्टन - सामान्यपणे चहा-कॉफी पिल्यानंतर आपण त्याचे कप टाकून देतो. त्यामुळे कचऱ्याची समस्या तयार होते. हेच कप जर खाता आले तर? एअर न्यूझीलंडने आपल्या विमानांमध्ये खाण्यायोग्य कॉफी कप आणले आहेत. विमानांमध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय म्हणून एअर न्यूझीलंडने हा अनोखा प्रयोग केला आहे.
खाण्यायोग्य कॉफी कप निर्मितीसाठी एअर न्यूझीलंडने 'ट्वीसी' या कप निर्मिती करणाऱ्या कंपनीसोबत करारही केला आहे. सुरूवातीला 'व्हॅनिला फ्लेवर'मध्ये हे कॉफी कप तयार केले आहेत. त्यात कुठलाही उष्ण द्रव खाद्यपदार्थ टाकला तरी तो विरघळत नाही.
हेही वाचा - ढोलकी वाजविणाऱ्या लोकांच्या मेंदूची रचना आणि कार्यक्षमता असते उत्तम
एअर न्यूझीलंडमध्ये दरवर्षी 80 लाखांपेक्षा जास्त कप कॉफी ग्राहकांना दिली जाते. त्यामुळे कचऱ्याची खूप मोठी समस्या भेडसावत होती. मात्र, खाण्या योग्य कॉफी कपच्या प्रयोगामुळे ही समस्या कमी होत आहे. ग्राहकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती, एअर न्यूझीलंडच्या ग्राहक अनुभव व्यवस्थापक निक्की चॅव्ह यांनी दिली.