बिजिंग - अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांच्यासह २८ जणांवर चीनने निर्बंध घातले आहेत. चीनच्या सार्वभौमत्त्वाला धक्का पोहचवल्याचा आरोप ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. काल (बुधवार) डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळ संपला तर जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कारभार हाती घेतला. त्याचवेळी चीनकडून ही कारवाई करण्यात आली.
अमेरिकी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चीनने कारवाई केली आहे. व्यापार, परराष्ट्र विभागाचे राजनैतिक अधिकारी, माजी सुरक्षा सल्लागार, आशिया विभागाचे कामकाज सांभाळणारे अधिकाऱ्यांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर चीनने निर्बंध घातले आहेत. चीनसोबतच्या अनेक मुद्द्यांवर या अधिकाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चीनमध्ये येण्यास बंदी -
या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना चीनमध्ये येण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. मोरोक्को आणि हाँगकाँगमध्येही प्रवेशास बंदी असणार आहे. मागील काही वर्षांपासून अमेरिकेतील चीनविरोधी राजकारण्यांनी स्वत: च्या फायद्यासाठी तिरस्कार पसरवला. अनेक चुकीचे निर्णय घेतले, असे अमेरिकेने म्हटले आहे.
2017 साली अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर चीन अमेरिका वाद आणखी चिघळला होता. व्यापार, तैवान आणि हाँगकाँग प्रश्न, कोरोना विषाणू, दक्षिण चिनी समुद्रातील चीनची दादागिरी अशा अनेक मुद्द्यांवर अमरिका चीन अमेरिका भिडले आहेत. आता अमेरिकेत सत्ताबदल झाल्यानंतर चीन अमेरिका वाद आणखी चिघळतो की शांत होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.