कॅनबेर्रा : ऑस्ट्रेलियामध्ये फेब्रुवारीच्या मध्यात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मार्चच्या अखेरपर्यंत देशातील सुमारे १५ टक्के जनतेला लस देण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात आले आहे. सुरुवातीला मार्चमध्ये लसीकरण सुरू करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, आता नियोजित वेळेच्या पूर्वीच हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
रुग्ण कमी, त्यामुळे घाई नाही..
अमेरिका, इंग्लंड, भारत अशा देशांमध्ये कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी यापूर्वीच देण्यात आली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णवाढीचा दर तुलनेने कमी असल्याने लसीकरणाबाबत घाई करण्याची गरज नसल्याचे मत सरकारने मांडले होते. त्यामुळेच येत्या मार्चमध्ये लसीकरण सुरू करण्याचा सरकारचा मानस होता.
प्रक्रिया वेगाने, मात्र शॉर्टकट नाही..
गुरुवारी देशाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले, की जानेवारीच्या शेवटी ऑस्ट्रेलियन रेग्युलेटर फायझर लसीला परवानगी देतील. त्यानंतर दोन आठवड्यांमध्ये ही लस देशात दाखल होईल. साधारणतः लसीकरण मंजूरी प्रक्रिया ज्या वेगाने चालते, त्यापेक्षा लवकरच ही प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, आम्ही कोणतीही पायरी न चुकवता, कोणताही शॉर्टकट न वापरता ही प्रक्रिया पार पाडत आहोत, असेही मॉरिसन यांनी यावेळी स्पष्ट केले.
आठवड्याला ८० हजार डोस..
मॉरिसन यांनी सांगितले, की आठवड्याला लसीचे ८० हजार डोस देण्याचे आमचे लक्ष्य आहे. या वेगाने ऑस्ट्रेलियाच्या २६ मिलियन लोकसंख्येपैकी ४ मिलियन जनतेला मार्चच्या अखेरपर्यंत लस मिळाली असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणार; फ्रान्स सरकारचे आश्वासन