कॅनबेरा : अॅस्ट्राझेनेका कंपनीसोबत कोरोनावरील लसीच्या उत्पादनासाठी ऑस्ट्रेलियाने करार केला आहे. अॅस्ट्राझेनेका ही ब्रिटिश-स्वीडिश औषधनिर्माण कंपनी आहे.
ऑक्सफोर्ड विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणारी कोरोनावरील लस, ही सर्व चाचण्यांमध्ये परिणामकारक आणि सुरक्षित सिद्ध झाली; तर देशातील प्रत्येक नागरिकासाठी आपण ती उपलब्ध करणार आहोत, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुधवारी जाहीर केले. यासाठीच अॅस्ट्राझेनेकासोबत हा करार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
जर ही लस यशस्वी ठरली, तर आपण तातडीने त्याचे मोठ्या स्तरावर उत्पादन सुरू करणार आहोत. देशातील २५ दशलक्ष नागरिकांना ही लस मोफत उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या लसीची निर्यातही करण्याचा त्यांचा विचार आहे, मात्र याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही. इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो, पापा-न्यू गिनीचे पंतप्रदान जेम्स मारापे आणि फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनिमारामा यांच्यासोबत आपण लसीबाबत चर्चा केल्याचे मॉरिसन यांनी सांगितले. पॅसिफिक कुटुंबामध्ये लस पुरवठा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया महत्त्वाची भूमीका बजावेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : ऐन स्वातंत्र्यदिनी अफगाणिस्तानमध्ये ठिकठिकाणी स्फोट