नवी दिल्ली - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला अमेरिका-तालिबान करार आज कतारमधील दोहा येथे होणार आहे. या वेळी ३० देशांचे प्रतिनिधी येथे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भारतीय राजदूतांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचे कतारमधील राजदूत पी. कुमारन या कराराचे साक्षीदार असणार आहेत. या करारानुसार, ५ हजार तालिबानी दहशतवाद्यांना कैदेतून मुक्त करण्यात येणार आहे.
अमेरिका-तालिबान कराराशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीमध्ये अधिकृतरीत्या सहभागी असण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केलेले असताना भारताने त्याच्याशी मित्रत्वाचे संबंध ठेवले नव्हते. तसेच, त्या सरकारला मान्यताही दिली नव्हती, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.
तालिबान-अमेरिका करारानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य हळहळू माघारी बोलावण्यात येणार आहे. यामुळे अफगाणिस्तामध्ये तब्बल १८ वर्षे चाललेले अमेरिका-तालिबान युद्ध थांबणार आहे. अफगाण सरकार आणि अमेरिकेच्या तालिबानी दहशतवाद्यांशी सुरू असलेल्या युद्धामुळे देशाची स्थिती सध्या जर्जरित बनली आहे.
करारावेळी, अमेरिकेचे महासचिव माईक पॉम्पिओ उपस्थित राहणार आहेत. तर, सुरक्षा सचिव मार्क एस्पर अफगाण सरकारसह संयुक्त जाहीरनामा प्रस्तुत करणार आहेत, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिका आणि तालिबानदरम्यान मागील आठवड्यात चर्चा पूर्ण झाली होती. यानंतर २९ फेब्रुवारीपर्यंत ७ दिवसांचा शांतता काळ यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
हेही वाचा - पाकिस्तानामध्ये रेल्वे आणि बसचा भीषण अपघात; 30 जणांचा मृत्यू
या कराराच्या पार्श्वभूमीवर भारताचे विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी अफगाण राष्ट्रपती अशरफ गणी, सीईओ अब्दुल्ला अब्दुल्ला यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली. तसेच, अफगाणमध्ये शांतता नांदावी, देशाचे संरक्षण आणि विकास यासाठी भारत नेहमी सोबत राहील, असे आश्वासनही दिले.
शुक्रवारी, अफगाण सरकारचे ६ सदस्यांचे शिष्टमंडळ तालिबानशी चर्चा करण्यासाठी कतारला रवाना झाले. ही अफगाण सरकार आणि तालिबानदरम्यानची पहिली बैठक असणार आहे. या पथकातील सदस्यांची निवड स्वतः राष्ट्रपती गणी यांनी केली, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
हेही वाचा - इराणच्या उपराष्ट्रपतीही कोरोनाच्या तडाख्यात; देशात मृतांची संख्या २६ वर