क्वेट्टा- पाकिस्तानमध्ये आयईडीच्या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण हे स्फोटात जखमी झाले आहेत. ही स्फोटाची घटना चमन शहरात बांधकामाधीन इमारतीजवळ झाल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.
आईडी (विस्फोटक) हे चमन शहरातील सिटी मॉल रस्त्यावर मोटारसायकलमध्ये बसविण्यात आले होते, असे स्थानिक माध्यमाने म्हटले आहे. या आईडीच्या भीषण स्फोटानंतर जवळील मॅकनिकचे दुकान उद्धवस्त झाले.
सुरक्षा दलाकडून स्फोटानजीकचा परिसर बंद करण्यात आला आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप, स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. पंतप्रधान इम्रान खान यांनी चमनमधील स्फोटाच्या घटनेचा निषेध केला. स्फोटामधील जखमींच्या तब्येतीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे.
गेल्या काही महिन्यांत बलोचिस्तानमध्ये हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी 21 जुलैला तुर्बाट बाजारामध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता. तर 6 जण जखमी झाले होते.