वॉशिंग्टन डी. सी. - आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोपेची गरज ही वयोगट, लिंग आणि भौगोलीक परिस्थितीनुसार भिन्न असते. तरुण मुली या मुलांपेक्षा जास्त वेळ झोप घेतात, असे एका संशोधनात समोर आले आहे.
हेलसिंकी विद्यापीठातील संशोधकांनी 17 हजार पेक्षा जास्त लोकांच्या झोपण्याच्या पद्धती आणि सवयींचा अभ्यास केला. तारुण्यात येताना झोपण्याचा कालावधी कमी होतो असा समज होता. मात्र, या नवीन अभ्यासानुसार तारुण्यात येताना व्यक्तीच्या झोपण्याच्या कालावधीत वाढ होत असल्याचे निष्पन्न झाले, असे या संशोधनाच्या प्रमुख लिसा कुला यांनी सांगितले.
हेही वाचा - मलेशियात तब्बल २७ वर्षांनी सापडला पोलिओचा रुग्ण
भौगोलिक परिस्थितीचा व्यक्तीच्या झोपण्यावर परिणाम होतो. युरोप आणि उत्तर अमेरिका खंडातील लोक सर्वात जास्त काळ झोपतात, तर आशियातील लोक सर्वात कमी काळ झोपतात, असे ही या संशोधनात समोर आले आहे. 'स्लीप मेडिसीन' या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले.