जिनिव्हा : जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रायसस यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले आहेत. बायडेन यांनी अध्यक्षपदाचा कारभार सांभाळताच बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांपैकीच एक निर्णय म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये अमेरिकेला पुन्हा सामील करुन घेणे.
हा आमच्यासाठी, आणि जागतिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. जागतिक आरोग्याबाबत अमेरिकेची भूमीका ही नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली आहे, असे टेड्रोस म्हणाले. ते जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या १४८व्या बैठकीत बोलत होते.
'यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अॅन्ड इन्फेक्टीव्ह डिसिजेस' केंद्राचे संचालक अँथनी फाऊची यांनी अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख म्हणून आपले भाषण केले. यामध्ये त्यांनी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेत परतल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत वक्तव्य केल्याच्या काही मिनिटांनंतर गेब्रेयसस यांनी आपला आनंद व्यक्त केला.
राष्ट्राध्यक्ष बायडेन, अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिका पुन्हा जागतिक आरोग्य संघटनेत येईल हे आपले आश्वासन तुम्ही पूर्ण केले. याबाबत तुमचे आभार, अशा शब्दांमध्ये टेड्रोस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यासोबतच अमेरिका कोव्हॅक्स आणि एसीटी अॅक्सलरेटर या मोहिमांमध्येही सहभागी होणार असल्याबाबतही त्यांनी बायडेन यांचे आभार मानले.
हेही वाचा : पदभार स्वीकारताच बायडेन यांचा मोठा निर्णय, पॅरिस करार पुन्हा लागू करणार