वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेत एकूण कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली आहे. जगभरात अमेरिकेमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने रुग्णांची ताजी आकडेवारी दिली आहे.
जगातील एकूण रुग्णांच्या २३ टक्के रुग्ण अमेरिकेत -
विद्यापीठाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत एकूण रुग्णांची २ कोटी १ लाख २८ हजार झाली असून मृतांचा आकडा ३ लाख ४७ हजारांवर पोहचला आहे. सर्वात जास्त रुग्ण आणि मृतांची संख्या अमेरिकेत आहे. जगातील एकूण रुग्णांच्या २३ टक्के रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. कॅलिफोर्निया राज्यात सुमारे २२ लाख, टेक्सास राज्यात १७ लाख आणि फ्लोरिडा राज्यात १३ लाख रुग्ण आढळून आले आहेत. ९ नोव्हेंबरला अमेरिकेत १ कोटी रुग्णसंख्या झाली होती. त्यानंतर सुमारे दोन महिन्याच्या काळात आणखी एक कोटी रुग्णांची भर पडली.
डिसेंबर महिन्यात रुग्णसंख्या वाढली -
डिसेंबर महिना अमेरिकेसाठी सर्वात जास्त घातक ठरला. सर्वात जास्त रुग्ण डिसेंबर महिन्यात नोंदविण्यात आले. बुधवारी अमेरिकेते सर्वात जास्त म्हणजे ३ हजार ७५० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अमेरिकेतील विविध रुग्णालयामध्ये १ लाख २५ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. नव्या वर्षातही अमेरिकेतील कोरोनाची स्थिती सुधारली नसून कोरोनाविरोधातील लढाई सुरूच आहे.