काबूल - अमेरिकेन सैन्याने अफगाणिस्तानातील ISIS-K च्या ( इस्लामिक स्टेट खुरासान) ठिकाणांवर ड्रोन हल्ला करत सैनिकांच्या मृत्यूचा 48 तासांच्या आत बदला घेतला. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी (26 ऑगस्ट) दोन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. यात 169 अफगाण नागरिक आणि अमेरिकेच्या 13 सैनिकांचे प्राण गेले होते. यानंतर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना याची जबर किंमत मोजायला भाग पाडू, असा इशारा दिला होता.
अमेरिकेने ISIS-K संघटनेविरोधात शुक्रवारी मिशन तयार केले. या मिशनला नाव देण्यात आले नव्हते. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील नंगरहार येथे ISIS-K चं तळ आहे. या तळावर अमेरिकेन सैन्याने ड्रोनद्वारे हल्ला केला. लक्ष्य प्राप्त केले असून मिशिनमध्ये कोणत्याही सामान्य नागरिकाची हानी झाली नसल्याचे यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी सांगितले.
काय म्हणाले होते बायडेन?
काबूल विमानतळावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन पत्रकार परिषदेला संबोधित करताना भावनिक झाले. दहशतवाद्यांना या कृत्याची किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी म्हटलं. 'हा रक्तपात करून अमेरिकेला निर्वासन मोहीम पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही अफगाणिस्तानधील प्रत्येक अमेरिकन नागरिकाची सुटका करू. तसेच हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दहशतवाद्यांना दिला होता.
कुठे झाला हल्ला?
काबूल विमानतळाबाहेर एका हल्लेखोराने गर्दीत घुसून पहिला आत्मघातकी स्फोट घडवून आणला. त्यानंतर दुसऱ्या हल्लेखोराने आधी गोळीबार केला आणि मग स्वत:ला उडवलं. दोन्ही स्फोट हे विमानतळाच्या प्रवेशद्वारावरच झाले. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील निर्वासित रोज मोठ्या प्रमाणावर गोळा होत आहेत. आत्मघाती हल्ल्याद्वारे हे स्फोट करण्यात आले. तर याच्या काही वेळातच अॅबी गेटजवळच्या बॅरॉन हॉटलेजवळ काही अंतरावरच आणखी एक स्फोट झाला. तिथे ब्रिटिश सैनिक मुक्कामी होते.
काय आहे ISIS-K?
ISIS-K ही इस्लामिक स्टेट संघटनेची एक प्रादेशिक शाखा आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात ही संघटना सक्रिय आहे. अमेरिकेच्या नेतृत्वातील सहकारी सैन्याकडून होणाऱ्या कारवाईनंतरही इस्लामिक स्टेट-खुरासानचे अस्तित्व अफगाणिस्तानात कायम राहिले आहे. जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना म्हणून ही उदयास आली आहे. अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील सैन्य माघारीनंतर इस्लामिक स्टेटवर निगराणी ठेवणे आणि त्यांच्या हल्ल्याच्या नियोजनांबद्दल माहिती मिळणे कठीण होणार आहे. अमेरिका जगभरात ज्या दहशतवादी संघटनांशी लढत आहे. त्यापैकी इस्लामिक स्टेटचे आव्हान मोठे असल्याचे बायडेन प्रशासनाला वाटते. सैन्य माघारीनंतर अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत दहशतवादी संघटना आणखी मजबूत होऊन त्यांच्याकडून पश्चिमेवर हल्ले केले जाण्याची भीती अमेरिकन प्रशासनाला वाटते.
हेही वाचा - 31 ऑगस्टपर्यंत निर्वासन पूर्ण करण्यावर अमेरिकेचा फोकस
हेही वाचा - काबूल विमानतळावर अव्वाच्या सव्वा दाम; पाण्याची बॉटल 1 हजार तर एक राईस प्लेट 7 हजार 500 रुपयांना