न्यूयॉर्क - दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आणि घातक संकट म्हणजे कोरोना असल्याचे मत, संयुक्त राष्ट्रांचे सचिव अॅन्टोनिओ गुटेर्रस यांनी व्यक्त केले आहे. या विषाणूचा सर्व मानवजातीला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ही महामारी जगातील सर्व लोकांसाठी धोका आहे, शिवाय याचे आर्थिक परिणामही फार गंभीर असणार आहेत. या आपत्तीनंतर गेल्या कित्येक वर्षांमध्ये पाहिली नाही, अशी मंदी जगभरात येऊ शकते, असेही गुटेर्रस यावेळी म्हटले. "सामायिक जबाबदारी, जागतिक एकता : कोरोनाच्या आर्थिक परिणामांना प्रतिसाद" या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाच्या सादरीकरण सोहळ्यात ते बोलत होते. हा सोहळा व्हर्चुअली पार पडला.
या महामारीमुळे अशांतता, अस्थिरता आणि संघर्षही वाढत आहे. हे सर्व पाहता आपण निश्चितच असे म्हणू शकतो, की दुसऱ्या महायुद्धानंतर आलेली ही सर्वात मोठी आपत्ती आहे. त्यामुळे आपल्याला याला मजबूत आणि परिणामकारक प्रतिसाद देणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी राजकारण वगैरे गोष्टी बाजूला सारून, एकत्र येऊन सामायिकपणे प्रयत्न केल्यावरच हे शक्य आहे. कारण सध्या पूर्ण मानवजातीचे भविष्य पणाला लागले आहे, असेही ते म्हणाले.
आपण सध्या योग्य मार्गानेच वाटचाल करत आहोत, मात्र आपल्याला आपला वेग वाढवण्याची गरज आहे. या विषाणूला हरवायचे असल्यास आपल्याला सध्या करत आहोत त्यापेक्षा अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अॅन्टोनिओ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : कोरोनाविरोधातील लढाईत मोदींना मातोश्रींचा आशीर्वाद, दिला इतका निधी