टेक्सास - अमेरिकेतील टेक्सास राज्यात थंडीच्या लाटेमुळे नैसर्गिक आपत्ती उभी राहिली आहे. जोरदार बर्फवृष्टी आणि हीम वादळामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. संघराज्याकडून टेक्सास राज्याला मदत करण्याचा निर्णय बायडेन सरकारने घेतला आहे. अनेक भागात वीज गेली असून तापमान उणे झाले आहे. 'मोठी आपत्ती' घोषित करण्याचा विचार बायडेन सरकार करत आहे.
१ कोटी ३० लाख नागरिक प्रभावित -
या शीतलहरीमुळे सुमारे १ कोटी तीस लाख नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत टेक्सास राज्यात पाहणीसाठी येणार असल्याचेही राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जाहीर केले आहे. शीतलहरीमुळे सुमारे ६० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले. राज्यातील अनेक भागात हिमवादळामुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे.
अनेक भागांत वीज नाही -
शुक्रवारी राज्यातील एक लाख ऐंशी हजार घरे आणि व्यावसायांना वीज नसल्याने काळोखाचा सामना करावा लागला. राज्यातील सर्वात मोठे शहर ह्युस्टनला हिम वादळाचा सर्वात जास्त फटका बसला असून मदतकार्य राबविण्यात येत आहे. अडकून पडलेल्या नागरिकांना अन्न आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.