न्यूयॉर्क - साधारणपणे दशकभरानंतर अमेरिकेतून अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. मात्र, यावेळी त्यांना नासाच्या नव्हे, तर एका खासगी कंपनीच्या अंतराळयानातून पाठवण्यात येणार आहे. ही कंपनी आहे, स्पेसएक्स! मानवाला ज्या अंतराळस्थानकावरून चंद्रावर पाठवण्यात आले होते, त्या केनेडी स्पेस सेंटरवरून २०११ नंतर पहिल्यांदाच प्रक्षेपण होणार आहे.
'हा एक ऐतिहासिक क्षण आहे, तब्बल नऊ वर्षांनंतर आम्हाला अशी संधी पुन्हा मिळाली आहे' असे नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर जिम ब्रिडेनस्टाईन यांनी या लॉंचच्या पूर्वसंध्येला म्हटले. या लॉंचनंतर स्पेसएक्स ही अंतराळात मानव पाठवणारी पहिली खासगी कंपनी ठरणार आहे. अशी कामगिरी आतापर्यंत तीनच देशांनी केली आहे- अमेरिका, रशिया आणि चीन.
या मोहीमेसाठी नासाचे डग हर्ले आणि बॉब बेहन्केन या दोन अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. स्पेसएक्सच्या अंतराळयानातून या दोघांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यात येणार आहे. बॉबने "लॉंच डे, इन अमेरिका" असे ट्विट केले आहे. २७ मे रोजी अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचारच्या सुमारास हे लॉंच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (भारतीय प्रमाणवेळेनुसार, २७ मेच्या मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास). दरम्यान, वातावरण खराब असल्यामुळे सध्या टेकऑफची केवळ ६० टक्के शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे लॉंच पुढे ढकलले गेल्यास, ३० मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आणि ३१ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास (दोन्ही अमेरिकेतील प्रमाणवेळेनुसार) यासाठी संधी उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. या लॉंचचे थेट प्रक्षेपण हे लॉंचच्या वेळेच्या चार तास अगोदरपासून सुरू होईल. नासा, स्पेसएक्स यांच्या अधिकृत वेबसाईट, यूट्यूब किंवा ट्विटर हँडल्सवरून हे प्रक्षेपण पाहता येणार आहे.