मेक्सिको - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. शुक्रवारी मेक्सिकोमध्ये 523 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा 30 हजार 366 वर पोहचला आहे. मेक्सिको सध्या संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे,
चीनमधील वुहान येथून पसरलेल्या विषाणूचा प्रादुर्भावही हळूहळू मेक्सिकोमध्ये वाढत आहे. येथे संक्रमित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 2 लाख 45 हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
शनिवारी, कोरोना साथीच्या रोगराईत पुन्हा विक्री करण्याची परवानगी मिळावी, या मागणीसाठी सुमारे 200 पथ विक्रेत्यांनी मेक्सिको सिटीमधील अनेक प्रमुख मार्गांवर आंदोलन केले. शहराच्या पदपथावर सामान्यत: विक्रेत्यांनी गर्दी करतात. मात्र, मार्चपासून शहरात अशा प्रकारच्या अनौपचारिक व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातील बहुतेक प्रस्थापित व्यवसाय बंद केले आहेत. याविरोधात विक्रेते आंदोलन करत आहेत. यापुढे लॉकडाऊन पाळणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विक्री न केल्याने लोक हतबल झाले आहेत.
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान जगभरामध्ये 5 लाख 32 हजार 856 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 13 लाख 71 हजार 646 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आतापर्यंत 64 लाख 32 हजार 994 जण कोरोनामुक्त झाले आहेत.