वॉशिंग्टन - नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिका स्थित भारतीय यंदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणात मतदान करणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा असल्याचे अहवालात अंतर्भूत आहे. नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध यासाठी कारणीभूत आहेत. यामुळे डेमोक्रॅट पक्षाची पारंपारिक मतं देखील ट्रम्प यांच्याकडे वळण्याची शक्यता वाढल्याचे त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या निदर्शनास आले आहे.
या वर्षी तीन नोव्हेंबरला पार पडणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये अमेरिका स्थित भारतीय रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करणार असल्याचा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनिवासी भारतीयांसोबत असलेले घनिष्ट नातेसंबंध ट्र्म्प यांनी अधोरेखित केले.
भारताकडून आम्हाला मोठे सहकार्य मिळाले आहे. पंतप्रधान मोदी यांचीही कायम मदत झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत वास्तव्यास असणारे भारतीय रिपब्लिकन पक्षालाच मतदान करतील, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. भारत आणि अमेरिकेच्या पारंपरिक संबंधांविषयी ते व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ट्रम्प यांच्या 'आणखी चार वर्षे' (मोर फोर इयर्स) या निवडणूक कॅम्पेन दरम्यान ट्रम्प यांना काही प्रश्न विचारण्यात आले. याबाबत नॅशनल चेअर ऑफ ट्रम्प व्हिक्टरी फायनान्स कमिटीचे किंम्बर्ली गल्फॉएयल यांनी ट्वीट केले होते. तसेच हे ट्वीट डोनाल्ट ट्रम्प ज्युनियर यांनी रिट्विट केले. त्यातील व्हिडिओमध्ये या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अहमदाबादमध्ये ट्रम्प आणि मोदी एकत्र असल्याची छायाचित्र होती. तसेच मागील वर्षी अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा आणि उभतांमध्ये झालेल्या भेटीचेही चित्रीकरण होते.