वॉशिंग्टन डी. सी - जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव होऊन आता जवळपास दीड वर्ष झाले आहे. अमेरिका आणि विशेषतः तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर सुरुवातीपासूनच टीका करत आले आहेत. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा उल्लेख चिनी विषाणू किंवा वुहान विषाणू असा केला होता. आता पुन्हा त्यांनी कोरोना विषाणूवरून चीनला लक्ष्य केले. जगात कोरोना विषाणूच्या प्रसारास करण्यास चीन जबाबदार आहे. चीनने संपूर्ण जगाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. कोरोनामुळे सर्व देश उद्ध्वस्त झाले आहेत, असे ट्रम्प म्हणाले. तसेच त्यांनी पुन्हा कोरोना विषाणूला चीनी विषाणू संबोधलं.
कोरोनामुळे भारत आणि अमेरिकेला प्रचंड नुकसान सहन करावे लागले. अमेरिकेला नुकसान भरपाई म्हणून चीनने दहा ट्रिलियन डॉलर रक्कम द्यावी, असे फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारताचा संदर्भ देताना माजी ट्रम्प म्हणाले, यापूर्वी कोणत्याही आजारामुळे इतके मृत्यू कधी झाले नव्हते. सध्या भारतात काय घडत आहे ते पहा. ते किती चांगले काम करीत आहोत हे सांगण्याची सवय भारतातील लोकांना आहे. पण प्रत्यक्षात देश उद्ध्वस्त झाला आहे. खरं तर कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्येक देश उद्ध्वस्त झाला आहे. आता चीनने या सर्व देशांना मदत केली पाहिजे.
चीनने अमेरिकेचे सर्व आरोप फेटाळले -
चीनने कोरोना प्रसाराचे आरोप फेटाळले आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱया नेत्यांची जबाबदारी आहे, असे चीनने म्हटलं. ट्रम्प यांच्या कार्यकाळात कोरोनाची 2.4 कोटींहून अधिक कोरोना रुग्णे होती. तर मृतांची संख्या 4,10,000 पेक्षा जास्त होती. ट्रम्प यांनी वारंवार वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यास अपयशी ठरल्याबद्दल आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी म्हटलं.
कोरोना विषाणूची निर्मिती...
जगभर थैमान घालणारा कोरोना विषाणू सर्वप्रथम 2019 सालच्या शेवटी चीनमधल्या हुबेई प्रांतातल्या वुहानमध्ये आढळून आला होता. त्यानंतर कोरोनाचा जगभर प्रसार झाला. अनेक देशांनी चीन सरकारनेच हा विषाणू पसरवला असल्याचे आरोप केला. मात्र, चीन सरकारने मात्र, हे आरोप कायमच फेटाळून लावले. वूहानमधील एका लॅबमधून कोरोना विषाणू लीक झाला, अशी एक थेअरी मांडण्याता आली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील ही थेअरी मानणाऱ्यांपैकी एक आहेत.