जिनिव्हा - जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावरील दहा देशांची मंगळवारी निवड करण्यात आली. यामध्ये भारताचाही समावेश करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे.
डब्ल्यूएचओच्या निवड समितीने या कार्यकारी मंडळाची निवड केली. यामध्ये भारतासह बोट्स्वाना, कोलंबिया, घाना, गिनी-बिसाऊ, मादागास्कर, ओमान, रशिया, रिपब्लिक ऑफ कोरिया आणि युनायटेड किंगडमचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या जागतिक आरोग्य सभेच्या ७३व्या परिषदेमध्ये याबाबत घोषणा करण्यात आली. कोरोना विषाणूसंदर्भात डब्ल्यूएचओच्या प्रतिसादाची चौकशी करण्याच्या आवाहनानंतर भारताला या मंडळावर नियुक्त करण्यात आले.
जागतिक आरोग्य संघटना कोरोना महामारीला कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे, याबाबत स्वतंत्र्यरित्या चौकशी करण्याची बहुतांश राष्ट्रांनी मागणी केली होती. कोरोनामुळे जगभरात तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच जागतिक अर्थव्यवस्थाही जमीनदोस्त झाली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महामारीसाठी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला जबाबदार धरले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार सुरूवातीच्या टप्प्यात असताना चीनने जगाला याबाबत का सांगितले नाही, असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच, या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनाही काहीच करत नसल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. तसेच, डब्यूएचओला अमेरिकेकडून मिळणारा वार्षिक निधीही ४५० दशलक्ष डॉलर्सवरून कमी करत ४० दशलक्ष डॉलर्सवर आणला आहे. हा आदेश तात्पुरत्या स्वरूपाचा असून, जर येत्या तीस दिवसांमध्ये डब्ल्यूएचओने ठरावीक सुधारणा केल्या नाहीत, तर हा आदेश कायमस्वरूपी लागू करू, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : पूर्व अफगाणिस्थानमध्ये आत्मघाती हल्ला, गुप्तचर सेवेचे पाच कर्मचारी ठार