वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 57 हजार 621 कोरोना रुग्ण आढळले असून 3 हजार 802 जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्ययावत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 3 कोटी 53 लाख 88 हजार 157 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 10 लाख 41 हजार 537 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 2 कोटी 66 लाख 9 हजार 676 जण कोरोनामुक्त झाले आहेत. चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणू अटोक्यात आला आहे. मात्र, त्याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे.
अमेरिकेत 76 लाख 36 हजार 912 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 2 लाख 14 हजार 611 बळी गेले आहेत. याचबरोबर भारतामध्येही कोरोनाने पाय पसरले असून जागतिक आकडेवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच भारतापाठोपाठ ब्राझील, रशिया, कोलंबिया आणि पेरूमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.