वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये तब्बल 2 लाख 84 हजार 303 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर 8 हजार 61 जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात आतापर्यंत तब्बल 2 कोटी 5 लाख 22 हजार 191 कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे तब्बल 7 लाख 45 हजार 927 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 34 लाख 41 हजार 913 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
अमेरिकेमध्ये 53 लाख 5 हजार 957 रुग्ण आढळले असून 1 लाख 67 हजार 749 जणांचा मृत्यू झाला आहे, तर ब्राझिलमध्ये 31 लाख 12 हजार 393 कोरोना रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तर 1 लाख 3 हजार 99 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ब्राझिलपाठोपाठ भारत, रशिया, दक्षिण अफ्रिका, मेक्सिको, पेरू, कोलंबिया, स्पेनमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, कोरोना विषाणूवर लस तयार केली असल्याचा दावा रशियाने केला आहे. याबाबत मंगळवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अधिकृत घोषणाही केली. कोरोनासाठी अधिकृतरित्या लस मंजूर करणारा रशिया जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्याप यावर आक्षेप घेण्यात येत आहेत.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.