नवी दिल्ली - ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका कंपनीकडून संयुक्तरित्या बनविण्यात आलेल्या कोरोना लसीची चाचणी तात्पुरती थांबविण्यात आली आहे. लसीचा डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकावर गंभीर दुष्परिणाम दिसून आल्यानं चाचणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाविरोधातील या लसीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र, आता सुरक्षेच्या कारणास्तव या लसीच्या चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या लसीमुळे नेमका कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम झाले आहेत याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. आरोग्यासंबंधी माहिती देणारी वृत्तसंस्था 'स्टॅट'ने सर्वप्रथम याबाबतची माहिती दिली. युनायटेड किंगडममधील एका व्यक्तीला याचे दुष्परिणाम जाणवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले होते. यावर अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या प्रवक्त्याने अमेरिका आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या चाचण्या थांबवण्यात आलेल्या वृत्तास दुजोरा दिला.
गेल्या महिन्यात अॅस्ट्राझेनेकाने कोरोना लसीच्या सर्वात मोठ्या चाचणीसाठी अमेरिकेत जवळपास ३० हजार स्वयंसेवकांची नोंदणी सुरू केली होती. अशाच प्रकारच्या चाचण्या ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका अशा देशांमध्येही सुरू आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची चाचणी पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटकडूनही केली जात आहे.