वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदी विराजमान होतील. डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बायडेन-हॅरिस यांचे समर्थक विल्मिंग्टनमध्ये एकत्र आले. भारतीय प्रमाणवेळेसुमार रविवारी सकाळी 7 वाजता उपराष्ट्रध्यक्ष कमला हॅरिस यांनी अमेरिकन देशवासियांना संबोधित केले. यावेळी कमला हॅरिस यांनी मतदारांचे आभार मानले. तुम्ही सर्वांनी आशा, शालीनता, विज्ञान आणि सत्यांची निवड केली आहे, असे त्या म्हणाल्या.
'स्पष्टपणे मतदान करत, तुम्ही नव्या राष्ट्रध्यक्षपदी बायडेन यांना निवडलयं. अमेरिकेसाठी आज एक नवा दिवस उजाडला आहे. तसेच मी या कार्यालयातील पहिली महिला असेल. मात्र, मी शेवटची होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
आता खरी कामे सुरू झालीयं. साथीच्या रोगाचा नाश, अर्थव्यवस्थेची पुन्हा उभारणी, आपल्या न्यायव्यवस्थेत आणि समाजात पद्धतशीर वर्णद्वेषाचे उच्चाटन, ही कामे करायची आहेत. येथून पुढचा रस्ता सोपा राहाणार नाही. मात्र, अमेरिका तयार आहे, असे त्या म्हणाल्या.
पहिल्या कृष्णवर्णीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष -
कमला हॅरीस या उपराष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय वंशाच्या महिला ठरणार आहेत. कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. कमला यांच्या आई श्यामला गोपालन या मुळच्या तामिळनाडूतील होत्या. मात्र, शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या होत्या.