न्यूयॉर्क - अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ब्रॉक्स झू येथील ४ वाघ आणि ३ सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मलेशियातील एक वाघ कोरोना पॉझिटिव्ह आणि सहा मांजरींना कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर काही आठवड्यातच ही घटना समोर आली आहे.
न्यूयॉर्कमधील प्राणीसंग्रहालय चालवणाऱया वन्यजीव संवर्धन समितीने या बातमीला दुजोरा दिला आहे. वाघाला कोरोनाची लागण झाली असून सर्वात आधी मांजरींमध्ये कोरोना आढळून आल्याचेही या समितीने म्हटले आहे.
टायगर माऊंटन येथील ३ वाघ आणि ३ आफ्रिकन सिंह यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याचीही माहिती प्राणीसंग्रहालयाने दिली आहे. फेसिअल सॅम्पलद्वारे ही चाचणी करण्यात आली. जेणेकरून प्राण्यांना भूल देण्याची गरज पडली नाही, असेही सांगण्यात आले आहे.
कोरोनाची लागण झालेले सर्व प्राणी न्यूयॉर्कमधील वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कोरोनाने केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात पाय पसरवले आहेत. प्राण्यांना श्वसनास थोडा त्रास जाणवत असला तरी ते लवकर बरे होतील, असे प्राणीसंग्रहालयाकडून सांगण्यात आले आहे.