वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये सध्या अध्यपदाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे जो बायडेन यांच्यात अध्यक्षपदाची दुसरी वादविवाद फेरी होणार आहे. मात्र, ही वादविवाद फेरी 'व्हर्च्युअल' पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रम्प यांचा सहभागी होण्यास नकार
१५ ऑक्टोबर(गुरुवार) वादविवादाची दुसरी फेरी फ्लोरिडा राज्यात होणार आहे. कोरोनामुळे वादविवाद फेरी व्हर्च्युअली होणार आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला आहे. व्हर्च्युअली कार्यक्रम घेण्याची गरज नसल्याचे ट्रम्प यांचे मत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर वादविवाद फेऱ्या आयोजित करताना सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेला आला होता. कोविड नियमावलीचे पालन करत वादविवाद होणार असल्याचे आधी बोलले जात होते. मात्र, आता संपूर्ण वादविवाद फेरीच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कदाचित अमेरिकेच्या इतिहासातील व्हर्च्युअली वादविवाद होण्याची ही पहिलीच वेळ असावी.
एक आठवड्यापूर्वी ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. व्हिडिओ संदेश जारी करून प्रकृती स्थिर असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली होती. तसेच फ्लोरिडातील मायामी शहरात होणाऱ्या वादविवाद फेरीसाठी तयार असल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.