मुंबई - सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला गणेश मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जगभर प्रसिद्ध असणाऱ्या लालबाग राजाने देखील ‘मुर्तीची प्राणप्रतिष्ठा न करता ’देश हा देव असे माझा' हे वचन अंगिकारून गणेशोत्सव काळात ‘आरोग्यऊत्सव’ साजरा करण्याचा महासंकल्प केला आहे. ‘11 दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता त्या 11 दिवसांमध्ये महारक्तदान शिबिरे व प्लाझमा थेरेपी उपक्रम’ राबवण्याचे ठरवले आहे. ‘लालबागच्या राजा’च्या मंडळ बैठकीत पदाधिकारी व सदस्य यांनी हा निर्णय घेतला. कोरोना संकटात संपूर्ण जग लढा देत असताना सरकारला सहकार्य करणं कर्तव्य आहे. म्हणून, हा निर्णय घेतला असल्याचे पदाधिकाऱयांनी सांगितले.
लालबागच्या राज्याचा गणेशोत्सव अगदी साध्यापद्धतीने आणि समाजभान राखत साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीसाठी देण्यात येणार आहे. तसेच सिमेवर प्राण गमावलेल्या शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले.
लालबागचा राजा हे भाविकांचं मुख्य आकर्षण. दरवर्षी मुंबईमध्ये मोठय़ा दणक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून उंच गणेशमूर्ती आणि आकर्षक भव्य सजावटीमुळे यापैकी बहुतांश मंडळांनी प्रसिद्धी मिळविली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाविकांना आकर्षित करण्याची चुरस गणेशोत्सव मंडळांमध्ये लागली असते, लाखो कोटींची उलाढाल गणेशोत्सवात होते.
मात्र, यंदा कोणताही देखावा नाही, कोरोना संकटामुळे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेशमूर्तीची उंची तीन-चार फूट असावी. असे आवाहन मंडळांना केले होते. त्यापाठोपाठ यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मंडळांना केले. तसेच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रसिध्द लालबागचा राजा मंडळाने देखील 'यंदा राजाच्या मूर्तीची स्थापना न करता, राज्याच्या आरोग्य उत्सवा'कडे भर दिला आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे 87 वे वर्ष आहे. लालबाग गणेशोत्सव मंडळ यंदा ‘मूर्ती स्थापना व विसर्जन’ असा कोणताही सोहळा साजरा न करता श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत आरोग्य उत्सव आयोजित करण्यात येणार आहे .
"आरोग्य उत्सव" म्हणजे काय ?
महाराष्ट्रासमोर कोरोना संकट उभे राहिले आहे. त्याला पळवण्यासाठी मोठ्याप्रमाणात उपाययोजना म्हणजेच, 'आरोग्य उत्सव' होय असे मंडळाने सांगतिले. 'जनतेने काळजी घ्यावी' असा मजकूर फलक मंडळाने आगोदरच लावला आहे. तसेच चिनविरोधातही मंडळाने निषेध नोंदविला आहे.
रोगाशी लढताना रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच 1 हजार 546 रक्तदात्यांकडून रक्तदान करून मंडळाने पुढाकार घेतला आहे. जनता क्लिनिक माध्यमातुन रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या मदतीने "जनता क्लिनिक" मुंबईत राबविले. गणेश उत्सवाचे 11 दिवस रक्तदान व प्लाझमा थेरेपी उपक्रम राबवण्याचे मंडळाने ठरवले आहे.
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाप्रती योग्य मान सन्मान, तसेच कोरोना रोगाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवाच्या कुटुंबीयांना मदतीचा हातभार, असे अनेक संकल्प राबवून सेवा करण्याचा मानस यंदा लालबागच्या राजा मंडळाने केला आहे.
लालबागचा राजा आमचे दैवत आहे. यात कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. यंदा आरोग्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्याचा मानस आम्ही लालबाग सेवेकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे लोकांचे जीव वाचवून त्यांच्या शरीरात व हृदयात लालबागचा राजा कसा बसेल, याबाबत काम करण्याचे मंडळाने ठरवले आहे, असे पदाधिकाऱयांनी सांगितले.