मुंबई - सध्याच्या काळात अनेक कलाकार मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजच्या जंजाळात अडकलेले दिसतात. खरंतर जाणकारांच्या मते अभिनयाचा पाया घट्ट करायचा असेल तर नाटकाशिवाय पर्याय नाही. परंतु फार थोडे कलाकार नाटकावर जीवापाड प्रेम करतात आणि त्यातील एक म्हणजे अभिनेत्री पूजा कातुर्डे. अभिनेत्री पूजा कातुर्डेला प्रेक्षकांनी आत्तापर्यंत विविध मालिकेत पाहिले आहे. मालिकेतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. पण पूजा मात्र नाटक वेडी आहे. नाटक तिच्यासाठी मेडिटेशन थेरपी आहे, जगण्याची नशा आहे.
पूजा कातुर्डेने आत्तापर्यंत अहिल्या बाई होळकर, गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, बाकरवडी, सांग तू आहेस का? अशा मालिका, तर बबन, ती वेळ सारख्या चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. पूजाने आत्तापर्यंत प्रयोगिक एकांकिका केल्या आहेत. त्यात एलाब सोलो एक्ट प्ले, कवडसा सोलो एक्ट याचा समावेश आहे. त्याशिवाय २०१९ मध्ये पूजाने तिचा मित्र चैतन्य सरदेशपांडे सोबत गुगलीफाय या नाटकाचे प्रयोग केले. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे बंद असलेले हे नाटक पुन्हा सुरु केले आहे.
पूजा कातुर्डेचे नाटक प्रेम पूजा आपल्या नाटकाच्या प्रवासाबद्दल म्हणाली की, ‘’कलाकार म्हणून सुरुवात करत असताना आपली वेगवेगळी स्वप्न असतात. खरंतर लहानपणापासून माझा आणि नाटकाचा काही संबंध नव्हता. पण, २०१५-२०१६ मध्ये पुण्यामध्ये प्रदीप वैद्य यांचे थिएटर वर्कशॉप केले. त्या वर्कशॉपनंतर आम्हाला एकपात्री प्रयोग बसवायला सांगितला होता. जेव्हा प्रयोग सादर करायची वेळ आली मला अजूनही तो दिवस आठवतो, उत्साह होता तेवढंच टेन्शनही होतं. मला तो क्षण जगायचा होता, भीती होती, पोटात गोळा आलेला, अश्या सगळ्या संमिश्र भावनांनी मी प्रयोग केला. ती ४० मिनीटे खूप काही शिकवून गेली. त्यावेळी प्रेक्षकांच्या मिळणा-या प्रतिक्रीया, झालेल्या चूका, केलेली मजा हा संपूर्ण अनुभव खूप काही शिकवणारा होता. त्यानंतर मी रंगभूमीच्या प्रेमात पडले. विविध भाषांतील, विविध प्रकारची नाटकं पाहिली.”‘गुगलीफाय’ या नाटकाबद्दल पूजाने सांगितले की, ‘’दुनियादारी फिल्मी स्टाईल या मालिकेच्या शूटिंगच्या वेळी मी आणि चैतन्य वज्रेश्वरीला शूट करत होतो. त्यावेळी मला नाटक करायचे आहे, हे मी चैतन्यला सांगितले. त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये बसलो होतो. तेव्हा आजुबाजूला सगळे मोबाईलमध्ये होते, त्यावेळी आम्हाला या नाटकाची कल्पना सुचली आणि त्यानंतर काही महिन्यांनी चैतन्य हे नाटक घेऊन माझ्याकडे आला. ‘गुगलीफाय’ हे नाटक आजच्या पिढीचे आहे, जी इंटरनेट पिढी झाली आहे. सगळं काही गुगलला विचारणारी. पण, त्यामुळे आपली स्मरणशक्ती कमी होत चालली आहे. त्याचा गंभीर परीणाम नात्यावरही होत आहे. यावर हे नाटक आधारीत आहे.”पूजा पुढे म्हणाली, ‘’सध्या कलाकारांकडे वेगवेगळ्या संधी आहेत. पण, तरीही कलाकारांनी नाटकांचा अनुभव घेतलाच पाहिजे. माझ्यासाठी सुख म्हणजे काय, असं कोणी विचारलं तर मी रंगभूमी म्हणून सांगेन. नाटकासारखा अनुभव कुठेच नाही. टीव्ही- वेबसिरीजचा कधीतरी कंटाळा येऊ शकतो. पण, नाटकाचा कधीच कंटाळा येत नाही. मला कधी उदास वाटलं किंवा पुढे काय करावं हे सुचलं नाही की मी नाटकाकडे वळते. नाटक मला एनर्जी देते.”हेही वाचा - अमिताभ रश्मिका फोटो : बिगबींनी लिहिले 'पुष्पा'..चाहते म्हणाले, 'ही तर श्रीवल्ली'