रात्रीस खेळ चाले या मालिकेतील ऑल इन वन साळगावकर ही व्यक्तीरेखा साकारणऱ्या दीपक बाबाजी कदम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही शूट कधी सुरू होणार याबद्दल खात्रीशीर उत्तर दिले नाही. मग आम्ही या साळगावकर अर्थात दीपक कदम यांच्याशी गप्पा मारल्या. तसे हे कदम तळ कोकणातल्या देवगड जवळच्या आरे गावातले. कोकणात भजनाची मोठी परंपरा आहे. पखवाज वादनात तरबेज असलेल्या दीपक यांनी नाट्यवेडामुळे बीएससी होताच नाट्य शिक्षणासाठी शिवाजी विद्यापीठ गाठले. नाट्यशास्त्राची पदवी मिळताच काही काळ त्यानी टीव्ही चॅनेलमध्ये कामही केले. मात्र रंगभूमीच्या वेडापायी त्यांनी मुंबई गाठली आणि खडतर संघर्ष करुन नाटकाच्या मुख्य प्रवाहात स्वतःला सिध्द केले. कदम यांनी 'लोचा झाला रे' या नाटकाचे त्यांनी ५५० प्रयोग केलेत. इतकेच नाही तर 'अलबत्या गलबत्या' नाटकाचे आतापर्यंत ४७५ प्रयोग झाले आहेत. वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, काय बाई सांगू, घालीन लोटांगण, रात्रं दिन आम्हा, काय डेंजर वारा सुटलाय, सारे प्रवासी घडीचे, केशवा माधवा, ड्राय डे, पळा पळा कोण पुढे पळे तो, टाइम प्लीज, देहभान, अंधारात मठ्ठ काळा बैल, दर्शन, भरणी भरपाई (हिंदी - मुआवझे) , रिक्षावाले मामा, जमेल तसं, संन्यस्त खड्ग, आयला होरे, जिंकूया दाही दिशा, सारंगा तेरी याद में यासारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये दीपक यांनी भूमिका साकारल्या आहेत. कदम हे मराठी रंगभूमीवर गेली 20 वर्ष नट म्हणून कार्यरत आहेत. समांतर रंगभूमीपासून सुरवात करून, गेल्या वीस वर्षात आता पर्यंत समांतर आणि व्यवसायिक रंगभूमीवर मिळून एकूण 23 नाटक केली ज्याचे त्यांनी साधारण पणे 1500 च्या वर नाट्य प्रयोग केले.
![Deepak Kadam in](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12312081_baba.jpg)
झी मराठी वरील " रात्रीस खेळ चाले " च्या तिसऱ्या पर्वात त्यांची ऑल इन वन साळगावकर ही भूमिका प्रेक्षकांना आवडतेय. हा अनुभव कसा होता? याबद्दल दीपक म्हणाले, ''मला इथं वेगळा अभिनय करावा लागत नाही. ही मालिका माझ्या भाषेतली आहे. यातील पात्रे मी लहानपणापासून अवती भोवती पाहात आलोय. त्यामुळे दिग्दर्शक राजू सावंत जसा प्रसंग मला देतात तसा मी करतो.''
'रात्रीस खेळ चाले' ही मालिका कशी मिळाली? असे विचारले असता दीपक कदम म्हणाले, ''अर्थात ऑडिशनमधून. आमचे निर्माते सुनिल भोसले यांनी माझी रितसर ऑडिशन घेतली आणि माझी निवड झाली. मी कोकणी असल्याचाही विचार झाला असावा.''
रंगभूमीवर दीर्घकाळ वावरणाऱ्या दीपक कदम यांना आम्ही संस्मरणीय प्रसंग विचारला. यावर दीपक म्हणाले की १९९९ मध्ये आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत जिल्हा पातळीवर कौशल्य दाखवल्यानंतर महाविद्यालयासाठी विद्यापीठ पातळीवर पारितोषिक मिळवून दिलं. तो प्रसंग आजही अंगावर काटा आणणारा आहे. लोकगीताचे सादरीकरण करताना संबळ वाजवण्याचा तो प्रसंग होता. संबळावर पडलेल्या पहिल्या काठी पासून शेवटच्या ठेक्या पर्यंत प्रेक्षकातून संपूर्ण गाण्याला टाळ्या वाजवून गाण्याच्या ठेक्याचा ताल पकडून ते गाणं मुलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी आदेश बांदेकर कल्चरल को ऑर्डीनेटर होते. त्यांनी बॅकस्टेजला येऊन विचारले की तू संबळ नेहमी वाजवतोस का? मी पखवाज वाजवतो पण संबळ पहिल्यांदा वाजवली हे ऐकताच ते चकित झाले होते. ती सगळी त्या वाद्याची आणि त्या लोककलेची किमया होती.
नाटकाची आवड कशी निर्माण झाली याबद्दल बोलताना दीपक कदम म्हणाले, ''महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाटकाची आवड होती म्हणून कोल्हापूर मध्ये शिवाजी विद्यापीठात नाट्यशास्त्र पदविका हा कोर्स करण्यासाठी माझ्या कॉलेज मधील मित्र विनोद ठाकूर देसाई यांनी सुचवलं. त्या वेळी ते तिथे शास्त्रीय संगीत शिकत होते. अभिमानाची गोष्ट म्हणजे ते सध्या त्याच विभागात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मग त्यावेळी ठरवलं होतं इथून पुढचं शिक्षण स्वतः कमवा आणि शिका या धर्तीवर करायचं आणि त्याप्रमाणे कोल्हापूर मध्ये शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत असताना पार्ट टाईम नोकरी करून दोन वर्ष पदविका कोर्स पूर्ण केला. याच दरम्यान कोल्हापूर मधील संगीत आणि नाट्य क्षेत्रात मोठी परंपरा असलेल्या गायान समाज देवल क्लब या संस्थेमध्ये नाटक करायची संधी मिळाली. शिवाजी विद्यापीठातील शिक्षण सुरू असतानाच देवल क्लब या संस्थेमध्ये श्याम मनोहर, तसेच हिंदीतील मोठे नाटककार भीष्म सहानी, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज नाटककारांची नाटकं करण्याची संधी मिळाली.''
रंगभूमी वर काम करत असताना दरम्यान त्यांनी काही तुरळक मराठी - हिंदी मालिका केल्या. व. पु. काळे यांच्या पार्टनर या कादंबरीवर आधारित समीर रमेश सुर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या " श्री पार्टनर " चित्रपटात महत्वाची व्यक्तीरेखा साकारली आहे. पण या एकंदर प्रवासात त्यांचा जास्त ओढा रंगभूमीकडे असल्याने सातत्याने नाटक करत राहिले. त्यांना खूप उत्तम नाटक चांगल्या संस्थांमध्ये चांगल्या दिग्दर्शकांसोबत करायला मिळाली असं ते म्हणाले. बी एस सी केमिस्ट्री शिक्षण झालेलं असल्याने, नाटक करता करता मध्ये काही काळ त्यांनी फूड सेक्टर मध्ये फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी, ऑडिटर आणि ट्रेनर म्हणूनही काम केलं आहे.
![All in One Salgaonkar in 'Ratris Khel Chale'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12312081_deepak.jpg)
मुंबईत अभिनयासाठी आल्यानंतरचा अनुभव कसा होता? याबद्दल दीपक कदम म्हणाले, ''माझं नशीब थोर म्हणून की काय मुंबईमध्ये मला पहिलं नाटक करायला मिळालं ते मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थेचे. त्यानंतर पुढे साधारणपणे वर्षाला एक या प्रमाणात मी नाटक करत गेलो. या सगळ्या एकंदर नाट्य कारकिर्दीमध्ये उत्तमोत्तम नाटकं, चांगल्या संस्था, चांगले दिग्दर्शक तसेच वेगवेगळ्या नटां सोबत काम करायला मिळालं''
सध्या शुटिंग थांबले आहे. याचा किती फटका कलाकारांना बसलाय, असे विचारले असता कदम म्हणाले, ''कोरोना काळात सर्वच क्षेत्रातील लोकांचे नुकसान झालंय. मनोरंजन क्षेत्रातही मोठे नुकसान झालंय. नाटकं बंद आहेत. त्यामुळे निर्माते आणि कलाकार अडचणीत आले आहेत. थिएटर्स बंद आहेत त्याचाही फटका त्यावर अवलंबून असणाऱ्यांवर झालाय. सिनेगृह बंद आहेत कारण कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे सिनेक्षेत्राला मोठा फटका बसलाय. मालिकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सर्व काही पूर्ववत व्हावी अशी सगळेजण अपेक्षा धरुन आहेत. आमची रात्री खेळ चाले ही मालिकाही लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगून आहोत."
हेही वाचा - Naseeruddin Shah Hospitalised: नसीरुद्दीन शाह यांना न्युमोनिया; रुग्णालयात दाखल