मुंबई: झी टीव्ही वरील लोकप्रिय मालिका 'प्यार का पहला नाम राधा मोहन' उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. यात दामिनी (संभाबना मोहन्ती) (Sambhabana Mohanty) ही गुनगुनच्या स्कूल बसमध्ये राधा असताना, बॉम्ब ठेऊन राधा आणि गुनगुन (रीना चौधरी) (Reena Chaudhary) यांना ठार मारण्याच्या प्रयत्नात असते. पण दुसरीकडे राधा आणि गुनगुन ह्यांचा जीव धोक्यातआहे हे कळताच मोहन आणि त्रिवेदी कुटुंबीय त्यांना वाचवण्याच्या पुरेपूर प्रयत्नात असतात. तेव्हा तुलसी (कीर्ती नागपुरे) (Kirti Nagpure) गुनगुन ही धोक्याच्या स्थितीतून सुरक्षितरित्या परत येण्यासाठी तांडव नृत्य करून देवाला प्रार्थना करण्याचा निर्णय घेते.
नाट्यमय प्रसंग: वृंदावनमध्ये घडणाऱ्या 'प्यार का पहला नाम राधा मोहन' (Pyar ka pehla naam radha mohan) या नव्या परिपक्व प्रेमकथेचे कथानक खूप मनोरंजक आहे. यात मोहन (शब्बीर अहलुवालिया) नावाच्या एका बासरीवादकाची कथा सादर करण्यात आली आहे. आपल्या बासरीच्या मधुर स्वरांनी मोहन सर्वांवर मोहिनी घालत असे. महिला त्याच्याभोवती राहण्यास उत्सुक असत. पण काळाच्या ओघात त्याच्या बासरीतील ही सुरांची जादू आता लुप्त झालेली असते. त्यामुळे मोहन हा आत्ममग्न आणि चिडचिडा व्यक्ती बनलेला असतो. दुसरीकडे लहान वयातच राधा (निहारिका रॉय) ही मोहनच्या प्रेमात बुडालेली असते. राधा ही श्रध्दाळू आणि आशावादी मुलगी असते. मोहनला अशा उदास आणि निराश मन:स्थितीत पाहून त्याला पुन्हा हसता-खेळता जिवंत माणूस करण्याचा तिने निर्धार केलेला असतो. आगामी भागांमध्ये राधा-मोहनच्या प्रेमकथेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना काही उत्कंठावर्धक नाट्यमय प्रसंग पाहायला मिळतील.
प्रथमच तांडव नृत्य करणार होते: कीर्तीने आजवर कधीच तांडव नृत्य केले नव्हते आणि अशा नवख्या मुलीला हे क्लिष्ट नृत्य अल्पावधीत शिकून घेणे हे मोठे आव्हानात्मक होते. कीर्ती नागपुरे म्हणाली, मी आयुष्यात प्रथमच तांडव नृत्य करणार होते. मला पहिल्यांदा जेव्हा या प्रसंगाची माहिती सांगण्यात आली, तेव्हा मी मनातून थोडी धास्तावले. कारण मला या नृत्याची फारशी काही माहिती नव्हती. तांडव हे सर्वात कठीण नृत्यांपैकी एक आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे आणि अनेक वर्षांच्या सरावानंतरच ते नृत्य योग्य प्रकारे साकारता येते. पण हे नृत्य साकारण्यासाठी मला केवळ एक दिवसच मिळाला तेव्हा मी त्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्याबद्दल जितके शिकता आले, तितके शिकून घेतले. पण कसे कुणाला ठाऊक, पण मी केवळ एकाच टेकमध्ये या नृत्याचा प्रसंग चित्रीत केला. पण मी हे सांगू इच्छिते की हे नृत्य करण्यासाठी तुमच्या अंगात भरपूर शक्ती हवी, तोल सांभाळता यायला हवा आणि योग्य वेळी अचूक भावभावना दर्शवायला हव्यात. प्रेक्षकांना माझे हे नृत्य पसंत पडेल, अशी मी आशा करते.
सोमवार ते शनिवार प्रसारित: एका प्रसंगासाठी तांडव नृत्य शिकून घेताना कीर्तीला फार मोठा अनुभव मिळाला, तरी राधा आणि गुनगुन यांना मोहन त्या बसमधून कसा वाचवितो, ते पाहणे निश्चितच उत्कंठाजनक ठरेल. पण त्याला दामिनीच्या या कुटिल हेतूंची कल्पना येईल का? 'प्यार का पहला नाम राधा मोहन' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ‘झी टीव्ही’वर प्रसारित होते.