कोल्हापूर पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात सध्या राजकीय कुरघोडीचा तमाशा सुरू झाला आहे. चेकचोरी साखरचोरी महाकला मंडळ वरून थेट विद्यमान अध्यक्षांच्या हकालपट्टीपर्यंत हे राजकारण पोहचले आहे. गेल्या चार वर्षांपासून गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे महामंडळाची बदनामी तर होतच आहे शिवाय राजकारणाची किनार लागल्याने चित्रपट महामंडळाच्या अस्तित्वाला बाधा पोहचत आहे. पाहुयात ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट
मराठी चित्रपट व्यावसायिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ५४ वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्याच्या ७ शाखा असून ४८ हजार सदस्य आहेत. या महामंडळात गेल्या काही वर्षांत सिनेमाचे काम कमी आणि राजकारणच जास्त चालत आहे. खोट्या तक्रारी करणे सर्वसाधारण सभेत मारामारी करणे सभा उधळून लावणे असे प्रकार नित्याचे झाले आहेत. यामुळे महामंडळाची पूर्वीची आब राहिली नाही. तो राजकारणाचा अड्डा बनला आहे. महाकलामंडळाच्या स्थापनेमुळे वाद वाढवत तो चघळायला नवा विषय मिळाला आहे. यामुळे तमाशाचा फड चांगलाच रंगला आहे.
चेक चोरी प्रकरण
चित्रपट महामंडळाने रेल्वे स्टेशनसमोरील एका इमारतीत नवीन कार्यालय विकत घेतले आहे. लवकरच तेथे कार्यालयाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. यामुळे तेथे सध्या फर्निचरचे काम सुरु आहे. महामंडळाच्या खजानिस पदी निवडून आलेले संजय ठुबे हे पुणे येथे वास्तव्य करतात. फर्निचरसाठी खर्च येत असल्याने या कामाकरिता आपल्या अधिकारात सह्यांचे धनादेश कोल्हापुरातील कार्यालयात पाठवले होते. सह्या केलेले हे धनादेश देवल क्लब येथील जुन्या कार्यालयातील तिजोरीमध्ये ठेवले होते. तिजोरीतील हे धनादेश अज्ञाताने चोरले. याबाबत उपाध्यक्ष धनाजी यमकर संस्थेचे कार्यकारी संचालक रवींद्र बोरगावकर यांना माहिती नव्हती. सारस्वत बँकेचा हा धनादेश कुणीतरी त्यावर दोन लाखाची रक्कम टाकून तो उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्या आयडीबीआय बँकेतील खात्यावर भरला. आपल्या खात्यावर दोन लाख वटल्याचे कळताच तेही चक्रावले. अचानक आपल्या खात्यावर दोन लाख कोठून आले याची चौकशी केली असता महामंडळाचा धनादेश वटल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा डाव वेळीच लक्षात आल्यानंतर उपाध्यक्षांनी तातडीने ती रक्कम महामंडळाच्या खात्यावर वर्ग केली. पण बदनामीचे राजकारण कुठेपर्यंत पोहचू शकते याचा पुरावा मात्र मिळाला
साखर चोरी प्रकरण
लॉकडाऊन काळात काम बंद असल्याने अनेक सभासदांवर उपासमारीची वेळ आली होती. याकाळात संजय घोडवत उद्योग समूहाकडून सभासदांना वाटण्यासाठी धान्य तेल व साखर देण्यात आली होती. त्यातील राहिलेली साखर एका संचालकांनी परवानगी शिवाय घरी नेली. त्याची तक्रार उपाध्यक्ष धनाजी यमकर अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्याकडे केली. मात्र त्याच्यावर कारवाई न करता त्याकडे दुर्लक्ष करून अध्यक्ष भोसले यांनी त्याची पाठराखण केली असल्याचा सुरू उपाध्यक्ष यमकर व विजय पाटकर यांनी केला.
महाकलामंडळ प्रकरण
चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले महाकला मंडळ या नव्या संघटनेची स्थापना केली. यामध्ये राज्यातील १२५ संघटना सहभागी झाल्या असून त्याचे आठ लाख सदस्य आहेत. या सदस्यांना एकत्रित व्यासपीठ मिळावे सरकार दरबारी त्यांचे एकत्रितरित्या प्रश्न मांडता यावेत यासाठी त्याची स्थापना केल्याची भूमिका ते मांडत आहेत. पण यामागे राजकारण असल्याचा आरोप सध्या सिने क्षेत्रात सुरू आहे. मराठी चित्रपट महामंडळ असताना पुन्हा नव्या संस्थेची गरज काय होती असा सवाल त्यांचे विरोधकांनी केला आहे. तर मेघराज राजेभोसले यांना राज्यपाल नियुक्त आमदार व्हायचे आहे. त्यासाठी आपल्या पाठिशी राज्यभरातील सर्व कलावंत आहेत हे त्यांना कागदोपत्री दाखवायचे आहे. हे दाखवण्यासाठीच त्यांनी नव्या कला मंडळाची उठाठेव केली आहे. कला मंडळात महामंडळाला दुय्यम स्थान देण्याचे कारस्थान सुरू असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहे.
कोल्हापूर विरुद्ध मुंबई पुणे यांच्यात दुफळी
मराठी चित्रपटांचे माहेरघर असलेल्या व मातृसंस्था असलेल्या कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रधान कार्यलय हे मुंबईला हलवण्याच्या हालचाली सुरू आल्या होत्या. मात्र भोसले यांची अध्यक्ष पदावर निवड होताच त्यांनी महामंडळाचे ऑफिस पुणे येथे सुरू केले. महामंडळाच प्रधान कार्यालय कोल्हापूर येथे असले तरीयाचे सर्व कामकाज पुणे येथून चालते. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात कोल्हापूरचे महत्व कमी करण्याचा डाव भोसले यांचा आहे असा आरोप कोल्हापुरातील सभासदांचा आहे. त्यामुळे कोल्हापूर विरुद्ध मुंबईपुणे असा गट पडल्याचे सांगितले जाते.
सांस्कृतिक क्षेत्रात राजकारणाचा प्रवेश महामंडळाला घातक
महामंडळात राजकरण शिरले म्हणजे महामंडळाची अधोगतीचे वाटचाल सुरू असल्याचे जाणवते. राजकारण विरहित महामंडळ असावे, असे अनेक सभासदांना वाटते. ज्या चित्रपट महामंडळाचे तुम्ही अध्यक्ष आहात त्याचा विरोधात जाऊन तुम्ही महाकला मंडळाची स्थापना करता त्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महामंडळाचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्याचे काम अध्यक्षासह संचालक मंडळाने करावी अशी अपेक्षा माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी केली.
चित्रपटांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे
महामंडळाच्या प्रगतीच्या बातम्या कानावर येण्यापेक्षा त्यातील कुरघोडीच्या बातम्या जास्त ऐकायला मिळतात. मात्र अशा वेळी मराठी चित्रपटाला मिळणाऱ्या अनुदानावर व प्रलंबित प्रकरणावर काम करणे महत्वाचे ठरेल. अनेक तरुण या क्षेत्राकडे आकर्षित आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे काम महामंडळाने केले पाहिजे असे मत चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडीया यांनी व्यक्त केलं.
एप्रिल महिन्यात निवडणुकीची शक्यता
चित्रपट महामंडळाचा २०१६ ते २०२१ चा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. जानेवारी महिन्यात याची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे महामंडळाच्या राजकारण निवडणुकीची ईर्षा आतापासून दाखवली जात आहे.
मेघराज भोसले यांच्यासोबत आम्ही गेली साडेचार वर्षे होतो. त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. मात्र त्यांनी संचालक मंडळ व सभासदांच्या विश्वासाला तडा जाईल अशा पद्धतीने कामकाज करायला सुरुवात केली. महामंडळात राजकारण आणले. साखर चोर चेक चोर असलेल्या चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालण्याचा उद्योग केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. धनाजी यमकर उपाध्यक्ष चित्रपट महामंडळ
अध्यक्ष या नात्याने महामंडळ व सभासदांच्या हिताचा कारभार केला. मात्र संचालक मंडळातील काही जण व्यक्तीगत स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. त्यांची गैरकृत्ये उघडकीस येतील म्हणून माझ्याविरोधात एकवटले आहेत. त्यांनी माझ्या विरोधात मांडलेला अविश्वास ठराव हा बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीने अविश्वास ठराव मांडता येत नाही. याविरोधात कोर्टात जाऊ. अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही. आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सभासदांच्या हिताचे निर्णय होणे महत्वाचे होते. मात्र त्यांनी बेकायदेशीररित्या कामकाज केले. मेघराज भोसले संचालक चित्रपट महामंडळ
मेघराज भोसले यांच्या विरोधात आठविरुद्ध चार मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यांनी महामंडळात मनमानी व बेकायदेशीररित्या कामकाज केले. त्यांच्या व्यक्तीकेंद्रित कामकाजाला संचालक मंडळांनी विरोध केला. येत्या काही दिवसात संचालक मंडळाची बैठक होऊन अध्यक्ष व नवीन पदाधिकारी निवडले जातील. मला अध्यक्ष व्हायचे नाही.महामंडळ एक परिवार आहे. त्या ठिकाणी राजकारण असू नये ही भूमिका आहे. अभिनेता सुशांत शेलार संचालक चित्रपट महामंडळ.