मुंबई : मागील बऱ्याच महिन्यांपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेले सर्वच चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहेत. यापैकीच एक असलेला बहुचर्चित सिनेमा म्हणजे 'अन्य'. मराठीतील दिग्गज कलाकारांसोबतच हिंदी कलाकारांच्या अभिनयानं सजलेला आणि मराठीसह हिंदी भाषेतही बनलेला 'अन्य'च्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे.
मानव तस्करी ही मानवतेला लागलेली कीड असून, प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या समाजाला पोखरणारी आहे. ही कीड जर वेळीच ठेचली नाही, तर समाज अधोगतीला जायला वेळ लागणार नाही. हा विषय प्रभावीपणे मांडण्यासाठी एका डॅाक्युमेंट्रीचा आधार घेण्यात आला आहे. डॅाक्युमेंट्रीच्या आधारे समाजातील कटू वास्तव आणि भयावह सत्य सादर करण्याचा केलेला प्रयत्न म्हणजेच 'अन्य'.
अतुल कुलकर्णीची मुख्य भूमिका
सध्या हिंदीमध्ये धडाकेबाज भूमिका करण्यात बिझी असणारा अतुल कुलकर्णी या चित्रपटाचं मुख्य आकर्षण असून, त्याच्या जोडीला प्रथमेश परब, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे आदी मराठमोळ्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. मराठमोळ्या कलाकारांच्या साथीला हिंदीसह बंगाली सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली रायमा सेन, यशपाल शर्मा, गोविंद नामदेव आदी कलाकारही आहेत. त्यामुळं तगड्या स्टारकास्टच्या सहाय्यानं आशयघन कथानक 'अन्य'मध्ये पहायला मिळणार आहे.
चित्रपटाची तगडी टीम
दिग्दर्शनासोबतच या चित्रपटाचं लेखन सिम्मी यांनी केलं असून, महेंद्र पाटील यांनी संवादलेखन केलं आहे. डिओपी सज्जन कालाथील यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. तर हिंदी गीतरचना डॉ. सागर आणि सजीव सारथी यांनी लिहील्या आहेत. कॅास्च्युम डिझाईन निलम शेटये यांचे असून, साभा मयूरी यांनी कोरिओग्राफी केली आहे. थनुज यानी या चित्रपटाचं संकलन केलं आहे. या चित्रपटाने स्वीडनमधील ॲलव्हिसबीन फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट फिल्म, लंडनमधील फॅलकॅान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (जून एडिशन २०२१) मध्ये बेस्ट फर्स्ट टाईम डायरेक्टर आणि बेस्ट पिक्चर असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि टोरंटो इंडिपेन्डंट फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटानं कौतुकाची थाप मिळवली आहे.
हेही वाचा - रणबीर आलियाच्या लग्नाचे भन्नाट, व्यंग दाखवणारी मिश्कील मीम्स