जम्मू - सुपरस्टार शाहरुख खान मंगळवारी रात्री उशिरा जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णो देवी मंदिरात दाखल झाला होता. त्याचा बहुप्रतीक्षित 'जवान' चित्रपट रिलीजच्या पार्श्वभूमीवर त्याने मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं. जवान चित्रपटाचा प्री रिलीज कार्यक्रम चेन्नईत पार पडणार आहे. प्रेक्षकांना या इव्हेंटमार्फत सामोरं जाण्यापूर्वी जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा डोंगरावरील वैष्णोदेवीचं दर्शन त्याने घेतलं.
शाहरुख खान मंगळवारी सायंकाळी कटरा येथील बेस कॅम्पवर पोहोचला. मंदिरात पोहोचण्यासाठी त्याने ताराकोट मार्गावरुन प्रवास केला. रात्री ११. ४० च्या सुमारास मंदिरात प्रार्थना केल्यानंतर तो तातडीने निघून गेला. या तिर्थस्थळाला भेट देताना शाहरुखने निळ्या रंगाचं जाकीट परिधान केलं होतं. त्याने आपला चेहरा झाकला होता, असे व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये वैष्णो देवी श्राइन बोर्डाचे अधिकाऱ्यांसह, काही पोलीस आणि शाहरुखचे वैयक्तिक कर्मचारी दिसत आहेत. नऊ महिन्याच्या कालावधीत शाहरुखची वैष्णोदेवीची ही दुसरी भेट आहे. याआधी त्याने 'पठाण' चित्रपटाच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर मंदिराला भेट देऊन देवाचा आशीर्वाद घेतला होता.
शाहरुख खान भव्य 'जवान' प्री-रिलीज इव्हेंटसाठी तामिळनाडूला जाणार आहे. चेन्नईतील एका कॉलेजच्या प्रांगणात होणाऱ्या कार्यक्रमात 'किंग खान' हा 'जवान' दिग्दर्शक अॅटली यांच्यासोबत सहभागी होणार आहे.
'जवान' हा एक हाय-ऑक्टेन अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. तमिळ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक अॅटली यांनी दिग्दर्शित केला आहे. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर रोजी देशासह जगभरात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात साऊथ लेडी सुपरस्टार नयनतारा, विजय सेथुपती, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा यांच्याही भूमिका आहेत. बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण या चित्रपटात खास भूमिका साकारत आहे.
'जवान' चित्रपटातील तीन गाणी यापूर्वी रिलीज करण्यात आली आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणं बाकी आहे. आज चेन्नईत पार पडणाऱ्या प्री रिलीज इव्हेन्टमध्ये जवानचा ट्रेलर रिलीज होऊ शकतो. त्यामुळे शाहरुखच्या तमाम चाहत्यांच्या नजरा या कार्यक्रमावर खिळल्या आहेत.
हेही वाचा -
१. Ajay Devgan : अजय देवगण 'दे दे प्यार दे'चा सीक्वलसाठी झाला सज्ज...
३. Gadar 2 vs OMG 2 box office day 19: बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' करत आहे राज्य...