मुंबई : जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमधून मराठी चित्रपटाने सातत्याने आपली मोहोर उमटवली आहे. अलीकडच्या काही वर्षात मराठी चित्रपट आशय, विषय, मांडणीमध्ये कमालीचा बदलला आहे. दोन मित्रांमधील यारी दोस्तीची कथा सांगणाऱ्या एस एंटरटेन्मेंट बॅनरच्या 'रूप नगर के चीते' या चित्रपटाला 'जैसलमेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' उत्कृष्ट कथानकासाठी 'आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड' मिळाला आहे. या पुरस्काराबरोबरच 'टागोर आंतरराष्ट्र्रीय चित्रपट महोत्सव' 'इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' आणि 'महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात'ही आपली छाप सोडली आहे.
महत्वाच्या भूमिका : 'रूप नगर के चीते' या चित्रपटातून हाच विषय रंजकपणे मांडला आहे. या चित्रपटात करण परब, कुणाल शुक्ल, हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर आयुषी भावे, सना प्रभु, तन्विका परळीकर, ओंकार भोजने आणि रजित कपूर या कलाकारांच्या भूमिका आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवत आहे.
अनेक चित्रपट महोत्सवात गाजावाजा : 'बेस्ट नरेटिव्ह फीचर फिल्म'साठी 'टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समीक्षकांचा विशेष पुरस्कार 'रूप नगर के चीते' चित्रपटाला मिळाला असून 'इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' 'बेस्ट इंडियन फिचर फिल्म', संगीत आणि उत्कृष्ट छायाचित्रणासाठी चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' चित्रपटाची निवड झाली आहे. तसेच 'महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' ज्युरीने शिफारस केलेल्या 'आयकॉनिक भारत गौरव पुरस्कार २०२२' साठी पुरस्कार विजेते म्हणून ही चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या 'लिफ्ट-ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स २०२३' मध्ये चित्रपटाची अधिकृतपणे निवड झाली आहे. हा आघाडीच्या जागतिक ऑनलाइन चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.
पुरस्कारांचा वर्षाव हा मनाला आनंद देणारा : 'रूप नगर के चीते' या चित्रपटावर होणारा पुरस्कारांचा वर्षाव हा मनाला आनंद देणारा असल्याची भावना दिग्दर्शक विहान सूर्यवंशी आणि निर्माते मनन शाह यांनी व्यक्त केल्या. महोत्सवात समाविष्ट झालेल्या विविध राज्यांतील अनेक चित्रपटांमधून 'रूप नगर के चीते'ला हे पुरस्कार मिळाले असून जगभरातून आलेल्या अनेक चित्रपटांच्या यादीतून 'रूप नगर के चीते'ची झालेली निवड नक्कीच कौतुकास्पद आहे.
हेही वाचा : हॉलिवूड पदार्पणासाठी एसएस राजामौली सावध पवित्र्यासह संधीच्या शोधात