मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता मनोज बाजपेयी यांचा जन्म २३ एप्रिल १९६९ रोजी बिहारमधील बेलवा येथे झाला. आज तो आपला ५३ वा वाढदिवस साजरा करीत आहे. मनोज बाजपेयी हा बॉलिवूडमधील असा एक अभिनेता आहे ज्याने आपल्या अभिनयाने मोठ्या पडद्यावर अमिट छाप सोडली आहे. चित्रपटांमधील त्याच्या खास अभिनयासाठी तो ओळखला जातो. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला मनोज बाजपेयी याच्याशी संबंधित काही खास गोष्टींची ओळख करून देत आहोत.
मनोज बाजपेयी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला, पण त्याला लहानपणापासूनच कलाकार व्हायचे होते. वयाच्या १७ व्या वर्षी तो दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर मनोज बाजपेयी याने दिल्लीतून पूर्ण शिक्षण घेतले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्याने अभिनयाचे शिक्षण घेतले. मनोज बाजपेयी याने 1994 मध्ये 'द्रोह काल' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तो अगदी छोट्या भूमिकेत आणि काही क्षणांसाठी दिसला होता.
यानंतर मनोज बाजपेयी बॅंडिट क्वीन, दस्तक, मॉडिफिकेशन आणि तपन्ना यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला, परंतु मनोज बाजपेयीला बॉलीवूडमध्ये खरी ओळख 1998 मध्ये सत्या या चित्रपटाने मिळाली. या चित्रपटात त्याने भिकू म्हात्रे ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटासाठी मनोज बाजपेयीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सत्या चित्रपटानंतर त्याने शूल, पिंजर, वीर-झारा, 1971, गँग्स ऑफ वासेपूर, स्पेशल 26, अलीगढू आणि भोसले यासह अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अपयशामुळे निराश होऊन मनोजने अनेकदा मुंबई सोडण्याचे ठरवले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? मनोज बाजपेयी यांनी म्हटले आहे की, त्याने अनेकदा मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याची पत्नी शबाना यांनी त्याला रोखले. एक काळ असा होता की मनोज चित्रपटांमधून जवळजवळ गायब झाला होता. या कठीण काळात बोलताना मनोज सांगतो की, चांगले काम नसल्यामुळे मुंबई सोडून दिल्लीला शिफ्ट होण्याचे त्याने मन बनवले होते, पण पत्नीने ते थांबवले.
माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाला होता की, 'माझा '1971' हा चित्रपट होता ज्याला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. या चित्रपटाचे वितरण योग्य पद्धतीने झाले नसल्याने लोकांना हा चित्रपट पाहता आला नाही. चित्रपट न चालल्याने मला अजूनही वाईट वाटते. या चित्रपटानंतर माझ्याकडे ऑफर्स कमी आल्या. ज्या आले त्याही मनासारख्या नव्हत्या.'
मनोज बाजपेयी पुढे म्हणाला, 'त्याचवेळी माझ्या खांद्यामध्ये प्रॉब्लेम झाला आणि मी कोणतेही काम करू शकत नव्हतो. मी 'स्वामी', 'दस तोला', 'मनी है तो हनी है' सारखे चित्रपट केले पण मला त्यात मजा येत नव्हती. मी पुन्हा-पुन्हा विचार करत होतो की, मी थिएटर करण्यासाठी दिल्लीला परत जावे.
पण, माझी पत्नी शबाना ही दिल्लीची आहे, तिने मला वारंवार मुंबईत थांबवून सांत्वन दिले की काळजी करू नका, चांगल्या चित्रपटांच्या ऑफरही येतील.' मनोज सांगतो की, प्रकाश झा यांचा रणबीर आणि कॅटरिना स्टारर 'राजनीती' हा चित्रपट मिळताच त्याचे आयुष्य पुन्हा रुळावर आले आणि त्यानंतर हळूहळू सर्वकाही सुरळीत होऊ लागले.
हेही वाचा - मनोज बाजपेयीने सादर केलेली ''भगवान और खुदा'' कविता व्हायरल