मुंबई - Ileana D'Cruz Birthday: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आज आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईत 1 नोव्हेंबर 1987 रोजी जन्मलेल्या इलियानानं तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिनं अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. इलियानानं तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात साऊथ चित्रपटसृष्टीतून केली होती. 'देवदासु' हा तिचा पहिला चित्रपट होता. यासाठी तिनं सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकाराचा 'फिल्मफेअर' पुरस्कारही जिंकला आहे. 'देवदासु' चित्रपटानंतर इलियानानं 'पोकरी', 'किक', 'जुलै' यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये तिनं काम केलंय.
इलियानाने हिंदी चित्रपटसृष्टीत केला प्रवेश : इलियानाला साऊथमध्ये यश मिळवल्यानंतर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचा निर्णय घेतला. तिचा पहिला हिंदी चित्रपट 'बर्फी' होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटामध्ये तिच्यासह रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा हे मुख्य भूमिकेत होते. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटासाठी इलियानाला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचे चार पुरस्कार मिळाले. त्यानंतर तिनं 'मैं तेरा हीरो', 'बादशाहो', 'फटा पोस्टर निकला हीरो', रुस्तम आणि 'रेड' अशा अनेक चित्रपटामध्ये काम केलं. ती अखेरची अभिषेक बच्चनसोबत 'द बिग बुल' चित्रपटामध्ये दिसली होती. आपल्या स्टाईलनं लोकांना वेड लावणारी इलियाना डिक्रूज सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. अनेकदा ती तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
इलियानाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल : इलियाना डिक्रूझ ही मूळची गोव्याची आहे. तिनं गोव्यातील सेंट झेवियर्स हायर सेकेंडरी स्कूलमधून शिक्षण घेतलं. इलियाना डिक्रूझ तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. आता नुकतीच ती एका मुलाची आई देखील झाली आहे. अनेकदा इलियाना ही सोशल मीडियावर तिच्या बाळाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दरम्यान ती हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. इलियाना 'अनफेअर अँड लव्हली' या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाबरोबर दिसणार आहे.
हेही वाचा :