मुंबई - नेहमीचे साचेबंद विषय घेऊन काढलेले चित्रपट धपाधप कोसळताहेत. पूर्वी फॉर्म्युला चित्रपट म्हणून ओळखले जाणारे चित्रपट आता अजिबात चालत नाहीत. एक हिरो, एक किंवा दोन हिरॉइन्स, एक व्हिलन, तोंडी लावायला कॉमेडी, नाचगाण्यासाठी संगीत, क्लायमॅक्स ला दे दणादण मारामारी आणि शेवट गोड असा फॉर्म्युला सर्रासपणे वापरला जायचा आणि असे अनेक चित्रपट सुपरहिट सुद्धा झालेत. परंतु आताच्या घडीचा प्रेक्षक सुज्ञ झालाय. त्याला प्रत्येक गोष्टीत लॉजिक लागते तसेच सकस संहिता आणि त्याचे अर्थपूर्ण सादरीकरण असेल तरच तो चित्रपटगृहाच्या पायऱ्या चढतो. अन्यथा मनोरंजन आता त्याच्या मुठीत आलंय म्हणजेच तो आता मोबाईलवर मालिका, चित्रपट, वेब सिरीज पाहतो तेही त्याच्या सोयीनुसार. अर्थात हा बदल येण्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे कोरोना महामारीमुळे लादला गेलेला लॉकडाऊन. या काळात ओटीटी हेच एक साधन होते मनोरंजित होण्याचे. त्या सुमारास जागतिक पटलावर मनोरंजनसृष्टीत काय काय घडतंय आणि किती सकस विषयांची कशी हाताळणी होतेय हे समजून आले.
वर नमूद केल्याप्रमाणे या सर्व बदलात मोठा वाटा होता कोरोना कालखंडाचा. जेव्हा ही महामारी जगभरात पसरली तेव्हा संपूर्ण जग थांबले होते. या विषाणूची उत्पत्ती आपल्या शेजारील देशात झाली होती असे बरेच देश ओरडून सांगत होते. असंही म्हटलं जात होतं की त्या देशाने आपल्या शत्रू देशांना नामोहरम करण्यासाठी या विषाणूची निर्मिती केली होती. परंतु काही कारणास्तव ज्या प्रयोगशाळेत कोरोना विषाणूची पैदास केली जात होती तिथे गळती झाली आणि त्याच देशाला पहिला फटका बसला. परंतु तो अपराधी देश मात्र सतत नकारघंटा वाजवत आला आहे. परंतु जगभरात आता कोरोना उत्पत्ती कुठून झाली याचा शोध घेण्याच्या हालचाली जोरात सुरु झाल्या आहेत. भारतातही अशी हालचाल होत असल्याची कुणकुण आहे. लेखक, दिग्दर्शक अभिषेक शर्मा या विषयावर सिनेमा काढण्याच्या तयारीत आहेत. अभिषेक शर्मा एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी मैदानात उतरले आहेत निर्माते महावीर जैन.
अभिषेक शर्मा आणि महावीर जैन यांनी याआधीही एकत्र काम केलेले आहे. अक्षय कुमार अभिनित ‘राम सेतू’ साठी ते एकत्र आले होते. सूत्रांकडून असेही कळतेय की वुहान शहरातील प्रयोगशाळेतून गळती झालेल्या विषाणूच्या सभोवतालच्या वादांवर प्रकाश टाकला जाणार असून यामुळे जागतिक महामारी कशी झाली या विषयी अभिषेक शर्मा एक चित्रपट दिग्दर्शित करीत आहेत. अभिषेक शर्मा यांच्या परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण ला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता. त्यांचे राम सेतू आणि सूरज पे मंगल भारी लाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. अभिषेक शर्माचा यांचा हा पुढचा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असेल असे समजते.
सूत्रांनुसार, 'लेखक, दिग्दर्शक अभिषेक शर्माने त्यांच्या पुढील चित्रपटाची संहिता लिहून पूर्ण केली आहे. कोरोना अथवा कोव्हीड १९ अथवा वुहान व्हायरस म्हणून कुख्यात असलेला विषाणू केंद्रस्थानी असेल. कोरोना जेव्हा जागतिक समस्या बनला तेव्हाच्या पार्श्वभूमीवर सेट केलेला हा एक थ्रिलर आहे. हा महामारीवरील चित्रपट नाही तर त्याऐवजी एक लार्जर दॅन लाइफ ऍक्शन ड्रामा आहे. ज्या विषाणूने संपूर्ण जग थांबवले होते त्या कोविड विषाणूच्या मूळ कथेचा उलगडा या चित्रपटातून होईल. अर्थात या सिनेमाबद्दल जास्त माहिती उद्धृत करण्यात आलेली नाहीये. हा एक संपूर्ण भारतीय चित्रपट आहे जो वुहान लॅब लीक सिद्धांताची तपासणी करण्याचा मानस बाळगतो. या चित्रपटाची कथा उत्कंठावर्धक असून नजीकच्या काळातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे.'
अभिषेक शर्मा याने नेहमीच विविधांगी विषय हाताळले आहेत. त्यांच्या पहिल्याच तेरे बिन लादेन या चित्रपटात अनोखा विषय मार्मिकतेने मांडण्यात आला होता. निर्माते महावीर जैन यांनी उंचाई, राम सेतू, गुड लक जेरी सारख्या उत्तम कथा असलेल्या चित्रपटांचे समर्थन केले आहे. या नवीन चित्रपटाचे शीर्षक अजून ठरायचे असून त्यातील कलाकारांबद्दलही गुप्तता बाळगण्यात आली आहे.
हेही वाचा - Back To School : शालेय आठवणींची उजळणी करणारा चित्रपट बॅक टू स्कूल, पोस्टर झाले प्रदर्शित