बिलासपूर (छत्तीसगड) : बॉलीवूड अभिनेता आणि फिल्मस्टार अक्षय कुमारवर छत्तीसगड मधील एका वकिलाने भारताच्या नकाशाचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. वकिलाने या प्रकरणाची लेखी तक्रारही भारत सरकारच्या गृह मंत्रालयासह जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. या वकिलाने तक्रारीत म्हटले आहे की, 'चित्रपट स्टार अक्षय कुमार भारताच्या नकाशावर बूट घालून उभा आहे. जे जगाचा आणि भारताच्या नकाशाचा अपमान आहे. या प्रकरणासाठी दोषीं व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे, अशी वकिलाने मागणी केली आहे.
वकिलाची गृहमंत्रालयात तक्रार : छत्तीसगडच्या पेंद्रा येथील रहिवासी असलेले अधिवक्ता वीरेंद्र पंजाबी यांनी मंगळवारी याप्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यासह भारत सरकारच्या गृह मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की, 'बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार उर्फ राजीव भाटिया याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने व्हिडिओ पोस्ट करून भारताच्या नकाशाचा अपमान करत लोकांच्या भावना दुखावल्या आहेत'. भारतीय नकाशावर उभे राहणे हा भारत मातेचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अक्षय कुमारचे हे कृत्य राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत दंडनीय आहे, असे ते म्हणाले.
कायदा काय म्हणतो : द प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर अॅक्ट 1971 हा देशाच्या राष्ट्रीय चिन्हांचा, राष्ट्रध्वज, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रगीत, संविधान आणि भारताच्या नकाशाचा अपमान करण्यास मनाई करतो. असे करणे भारतीय संविधानाचा अवमान आहे. वकील वीरेंद्र पंजाबी यांनी या कायद्याचा आधार घेत अक्षय कुमारवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी यासंबंधीची तक्रार नवी दिल्लीतील केंद्रीय गृहखाते आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.
अक्षय कुमार ट्रोल : अक्षय कुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो भारताच्या नकाशावर चालताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री दिशा पटानी, मौनी रॉय, नोरा फतेही आणि सोनम बाजवा देखील आहेत. या वर्षी मार्चमध्ये नॉर्थ अमेरिका टूर ऑफ द स्टार्सच्या प्रचारासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर अक्षयला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्या गेलं आहे. काही नेटकऱ्यांनी अक्षयच्या कॅनडाच्या नागरिकत्वाकडे लक्ष वेधले तर काहींनी त्याच्या भारतीयत्वावर प्रश्न उपस्थित केले.