मुंबई - पंधराएक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैय्या’ आजही प्रेक्षकांना आठवतो. या चित्रपटाने हॉरर-कॉमेडी जॉनरला संजीवनी दिली होती. “मी पाहिलेला पहिला हॉरर-कॉमेडी चित्रपट म्हणजे ‘भूल भुलैय्या’. मला अजूनही तो आठवतो. आणि या फ्रँचायझी मधील दुसऱ्या भागात चक्क मीच काम करतेय हे स्वप्नवत वाटतंय”, असे चित्रपटाची हिरॉईन कियारा अडवाणी म्हणाली. तुला विद्याची भूमिका पुनरुत्थित करताना दडपण आलं होत का असे विचारल्यावर कियारा उत्तरली, “सर्वात महत्वाचं म्हणजे ‘भूल भुलैय्या २’ हा पहिल्या भागाचा रिमेक नाहीये. निर्मात्यांनी एका हिट चित्रपटाची फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी नावाचा वापर केला असला तरी या दुसऱ्या भागाचे कथानक पूर्णतः वेगळे आहे परंतु जॉनर मात्र हॉरर-कॉमेडीचा आहे. विद्याजी एक अप्रतिम अदाकारा आहे आणि मी त्यांची चाहती देखील आहे. माझी त्यांच्याशी तुलना होऊच शकत नाही. अर्थातच आम्हा दोघींमध्ये ‘मंजुलिका’ कॉमन आहे.”
कार्तिक आर्यनला अक्षय कुमारच्या भूमिकेत शिरताना कसे वाटले असे विचारले असता त्यावर तो म्हणाला, “मी अक्षय कुमारचे चित्रपट पहात मोठा झालोय. एक माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणूनही मी अक्षय कुमारचा मोठा चाहता आहे. त्याने आणि विद्या बालनजींनी ‘भूल भुलैय्या’ मधील प्रमुख व्यक्तिरेखा अजरामर करून ठेवल्या आहेत. मी स्वतः ‘भूल भुलैय्या २’ मध्ये काम करतोय या गोष्टीचा साहजिकच आनंद आहे. मी यातील भूमिका माझ्या पद्धतीने साकारली आहे आणि ती सर्वांना आवडेल अशी अपेक्षा आहे. कियाराने सांगितल्याप्रमाणे हा रिमेक नसून एक वेगळा सिनेमा आहे. पहिल्या ‘भूल भुलैय्या’ एव्हढाच किंबहुना थोडा जास्तच तो प्रेक्षकांना आवडावा ही इच्छा आहे आणि ‘भूल भुलैय्या २’ हा एक वेगळा चित्रपट म्हणून लोकांच्या आठवणीत राहावा असे वाटते.”
कियारा अडवाणीला हल्लीची ‘ड्रीम गर्ल’ म्हणतात. “खरं म्हणजे मी काय बोलावं हे कळत नाहीये. आपल्या चित्रपटसृष्टीत एकच ड्रीम गर्ल आहे आणि ती म्हणजे हेमा मालिनी. मी स्वतः हेमाजींची निस्सीम भक्त आहे. अर्थात अशी स्तुती होते तेव्हा मला धन्यता वाटते आणि मी नम्रपणे सांगू इच्छिते की हा ‘ड्रीम गर्ल’चा खटाटोप फॅन्सनी सुरु केलाय, मी नाही. हेमाजी हेमाजी आहेत.”
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनित आणि अनिस बाझमी दिग्दर्शित ‘भूल भुलैय्या २’ येत्या २० मे २०२२ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
हेही वाचा - अक्षय कुमारच्या 'सेल्फी' चित्रपटाचे पहिल्याच शेड्यूलमध्ये ९० टक्के शुटिंग पूर्ण