मुंबई - Arijit Singh sings for Salman : सुपरस्टार सलमान खान आणि गायक अरिजित सिंग यांच्यात सात वर्षांपूर्वी गैरसमज झाल्याचं सांगण्यात येत होतं. त्याच्या 'सुल्तान' चित्रपटासाठी 'जग घुमेया' हे गाणं आधी अरिजित सिंगनं गायलं होतं, मात्र नंतर ते काढून टाकण्यात आलं व त्याऐवजी हे गाणं राहत फतेह अली खानकडून रेकॉर्ड करण्यात आलं. त्यानंतर गेली सात वर्षे अरिजित सिंगनं अनेक गाणी गायली, तो लोकप्रियतेच्या शिखरावरही पोहोचलाय, पण त्याला सलमानच्या एकाही चित्रपटाचं गाणं गाता आलं नव्हतं. अखेर आता दोघांच्यामध्ये समेट झाल्याचं दिसतंय. सलमान खानच्या 'टायगर 3' या नवीन चित्रपटासाठी अरिजित सिंगनं गाणं गायलं आहे.
गुरुवारी सलमान खाननं त्याच्या इंस्टाग्राम 'टायगर 3' मधील 'लेके प्रभु का नाम' या पहिल्या गाण्याचं एक पोस्टर शेअर केलंय. पोस्टरवर सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ दिसताहेत. हे गाणे टायगर फ्रँचायझीच्या एक था टायगर (२०१२) मधील माशल्ला आणि टायगर जिंदा है (२०१७) मधील 'स्वॅग से स्वागत' या श्रेय नामावलीच्या गाण्यांच्या पॅटर्नचं असल्याचं समजतंय.
पोस्टरमध्ये लाल क्रॉप टॉपमध्ये कतरिना कैफ आणि काळा शर्ट आणि सनग्लासेस घातलेला सलमान खान दिसत आहे. दोन स्टार्सच्या मागे दोन बॅकग्राउंड डान्सर्स दिसतात. फोटो शेअर करताना सलमाननं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'पहले गाने की पहली झलक. लेके प्रभू का नाम! ओह हां, ये है अरिजित सिंह का पहला गाना मेरे लिए.'
सलमान खानच्या घोषणेनुसार टायगर 3 चित्रपटामधील या पहिल्या ट्रॅकचं लॉन्चिंग ट्रेलर रिलीजच्या एका आठवड्यानंतर, 23 ऑक्टोबर रोजी केलं जाणार आहे. सलमान खान आणि अरिजित सिंग या दोघांच्याही चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये शुभेच्छांचा वर्षाव केलाय. सलमानच्या चित्रपटासाठी अरिजित सिंग पार्श्वगायन करतोय हे अनेकांना स्वप्नवत वाटतंय. या गाण्याच्या स्वागतासाठी दोघांचेही चाहते सज्ज झाले आहेत.
'टायगर 3' हा चित्रपट दिवाळी सणाच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -
२. Naal 2 Bhingori Song Out : 'नाळ 2'मधील मनाचा ठाव घेणारं ‘भिंगोरी’ गाणं प्रदर्शित; पहा व्हिडिओ...
३. Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...