मुंबई - 'बबन' या आशयघन चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री गायत्री जाधव आता एकदम मनोरंजनक अशा "एकदम कडक" या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाली आहे. 'एकदम कडक' चित्रपटाचे एकामागून एक येणारे पोस्टर धुमाकूळ घालत आहे, एकदम कडक अशा कॉलेज लाईफ अनुभवणाऱ्या मुलांच्या पोस्टरनंतर आता मुलींच्याही पोस्टरची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता कॉलेजच्या मुली त्यांचे कॉलेजलाईफ जगताहेत आणि ते कसे हे येत्या 2 डिसेंबरला चित्रपटगृहात पाहणे रंजक ठरणार आहे.
'एकदम कडक' चित्रपटांच्या पोस्टरची लागलेली रांग पाहता चित्रपटाची उत्सुकता आणखीनच ताणली गेली आहे, शिवाय पोस्टरवरील मुलीही आता रसिक प्रेक्षकांच्या समोर आल्याने चित्रपटातील मुलं आणि मुली मिळून नेमका काय धुडगूस घालणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'बबन' चित्रपटातून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री गायत्री जाधव, प्रांजली कझारकर, जयश्री सोनावणे या अभिनेत्री एकदम कडक अंदाजात पाहायला मिळणार असून अभिनेत्री भाग्यश्री मोटे शिवाय अभिनेता पार्थ भालेराव, चिन्मय संत तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे व अरबाज हा तरुण कलाकारांचा ग्रुप रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-ekdam-kadam-poster-out-mjc10001_28102022134509_2810f_1666944909_61.jpg)
'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. तर हा चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला असून चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या सांभाळली आहे.
येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
हेही वाचा - एसआरके, प्रियांका, तापसीसह सेलेब्रिटींनी बीसीसीआयच्या समान वेतनाच्या घोषणेचे केले कौतुक